शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला Top 10 news: सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील 448 वसतिगृहांपैकी 416 वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” आणि मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलाय. सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ हा शब्द वापरण्यात आलाय. ‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतलाय. …पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेबाबत विविध चर्चांना उधाण आले असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरनाईकांनी मांडली. नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. पुढील सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच काही मंडळींकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून काहीजणांकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असं सरनाईकांनी सांगितलं. राज्यातील पशुवैद्यक,पशुधन पर्यवेक्षकांचे सामूहिक राजीनामे? राज्यातील सुमारे अडीच हजार शासकीय पशुवैद्यक आणि 4 हजार पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडून शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभा राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवीय आणि तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय. अत्यल्प मनुष्यबळ असताना एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवण्यात आला असून आधीच कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या पशुवैद्यकांना रात्री उशिरा ही तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभाग ठेवत असल्याचा आरोप राजपत्रित पशुवैद्यक संघटनेनं केलाय. 2500 शासकीय पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन आणि त्यानंतर सामूहिक राजीनामे देणार असल्यामुळ राज्यातील शासकीय पशु वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार जिल्ह्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थींचे प्रश्न आता गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आता गावातच ‘एनए’ (अकृषिक) परवाना, सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंद, विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रीमिलिअर मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात सध्या मार्च व एप्रिल महिन्यातील प्रत्येकी दोन दिवस महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिरे घेतली जाणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर सुरु राहील. त्या महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमूख, कार्यक्षम व गतिमान होण्याच्या दृष्टीने ही शिबिरे पहिल्या टप्प्यात ग्रामीण हद्दीतील महसूल मंडळांमध्ये होत आहेत. राज्यात यंदाचा उन्हाळा चटका वाढवणारा Top 10 news: यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले असून, पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात मार्च ते मे दरम्यान दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशाचे अन्य भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण, किमान तापमान मात्र सरासरी इतके राहण्याची शक्यता व्यक्त आहे. उन्हाळ्यात संपूर्ण पूर्व किनारपट्टी, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा. राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या उष्णतेच्या लाटांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरासरी बारा ते पंधरा दिवस उष्णतेच्या लाटांचा प्रभाव राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण पंढरपूर शहरात एका ट्रक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडालीय. सांगोला मार्गावरील चौकात हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत असून, या घटनेमुळे वाहतूक शाखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. व्हायरल व्हिडीओमध्ये अवजड वाहन चालकाला पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला जातोय. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळत नो एन्ट्रीचे उल्लंघन केल्याने नियमानुसार कारवाई केल्याचा दावा केलाय. सदर ट्रक चालकानं नो एन्ट्रीमध्ये वाहन आणल्यामुळे पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले, मात्र त्याची पावती दिली नाही, असा गंभीर आरोप केलाय. पुढे काही अंतर गेल्यानंतर चालकाच्या मोबाईलवर एक हजार रुपयांच्या दंडाचा मेसेज आल्याचं त्यानं सांगितलं. याबाबत विचारणा करण्यासाठी चालक परत चौकात आला असता पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता भारताची डोकेदुखी वाढणार इराणने ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणाऱ्या भारताला याचा आगामी काळात तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान सध्या भारताकडे सुमारे ४० ते ४५ दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा असल्याची माहिती कमोडिटी बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या ‘केपलर’ या संस्थेकडून देण्यात आली आहे. भारताकडे शंभर दशलक्ष बॅरल इतका कच्च्या तेलाचा साठा असून, यात स्टोअरेज टॅंक, भूमिगत साठे आणि जहाजांवर असलेल्या तेलाचा समावेश आहे. हा साठा सुमारे ४० ते ४५ दिवस वापरता येऊ शकतो. जागतिक इंधन पुरवठ्याचा विचार केला तर २५ टक्के इंधनाची वाहतूक ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होते. भारतच नव्हे चीन, जपानसह इतर देशांचे इंधन आयातीचे गणित गडबडू शकते. भारताकडून ८८ टक्के कच्च्या तेलाची आयात विदेशातून केली जाते. यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कच्च्या तेलाचा पुरवठा आखाती देशांमधून तोही ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होत असतो. खामेनी यांचे पुत्र मोज्तबा इराणचे नवे सर्वोच्च नेते युद्धादरम्यान इराणला एक नवीन सर्वोच्च नेते मिळाले आहेत. इराणच्या तज्ञांच्या सभेने अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची देशाचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड केलीय. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. तेव्हापासून, हे पद पुन्हा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र , नवीन नेते म्हणून मोजतबा यांची निवड करण्याचा निर्णय इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली घेण्यात आला होता असं म्हटलं जातंय. २८ फेब्रुवारी रोजी, अमेरिका आणि इस्रायलने एकाच वेळी इराणवर हल्ला केला आणि त्या रात्री इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांची हत्या केली. प्रत्युत्तर म्हणून, इराणने सात आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करून हल्ले केले. यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत अशांततेची लाट उसळली. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार पश्चिम आशियात तणावाची पातळी झपाट्याने वाढत असताना इराणचे नवे संरक्षण मंत्री माजिद इब्न अल रजा यांचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इराणची राजधानी तेहरान आणि कोम शहरात, जिथे नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया अपेक्षित होती, त्या ठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील संसद भवन परिसरालाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत अनेक सदस्य ठार किंवा जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी मतदान सुरू असताना 88 सदस्यांच्या परिषदेवर इस्रायलने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, इराणकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले असून हल्ल्यापूर्वीच संबंधित इमारत रिकामी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सचिन पिळगावकरांना GEN-G पिढी ट्रोल करते Top 10 news: बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव असूनही सचिन पिळगावकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. आता यावर अभिनेते विकास समुद्रे व्यक्त झाले आहेत. तसेच, त्यांना ट्रोल करणाऱ्यांना खरं खोटं सुनावलंय. “मी खात्रीनं सांगतो, पन्नाशीतला किंवा साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत नाहीये.ही जेन-झी पिढी त्यांना ट्रोल करत आहे.कारण त्यांनी अजूनही सचिन पिळगावकर यांना नीट ओळखलेलं नाही. त्यांचा ऑरा वेगळा आहे.हिंदीतील अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत सचिन यांचं उठणं बसणं असतं. तर, त्यांचा ऑरा असणारच ना… लहानपणापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलंय.त्यांना जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा खरंच वाईट वाटतं…”असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.