जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून धडाका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आजपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज कोकणात प्रचारसभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या परभणी, लातूर आणि सोलापुरच्या अक्कलकोटमध्ये सभा होणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज बारामतीत चार सभा होणार आहेत. दरम्यान, या जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारामुळे मुंबई महापौर पदाची निवड ही आता लांबणीवर पडली आहे. म्हणजे आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही निवड होणार आहे. less मुंबईच्या महापौराची जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच निवड मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी याठिकाणचा महापौर हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच बसणार हे आता स्पष्ट झालंय. आजपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व्यस्त होणार आहेत. सोबतच, भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित गटनोंदणीसंदर्भात अद्यापही चर्चा सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच, म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच मुंबईचा महापौर ठरणार असल्याची माहिती समोर येतीय. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेनं कौल दिला. पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आदिवासी शेतकऱ्यांच्या किसान मोर्चाच्या मागण्यांना सरकारची मान्यता नाशिक ते मुंबई काढण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर आदिवासी किसान मोर्चाच्या मागण्यांना सरकारकडून मान्यता देण्यात आलीय. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत शिष्टमंडळाने शेतकरी व आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाची सविस्तर मांडणी केली. यानंतर शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण हमी मुख्यमंत्र्यांनी दिलीय. अंमलबजावणीत त्रुटी राहू नयेत यासाठी मंत्रीस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल Top 10 news : एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘पुढील पाच वर्षांत मुंब्रा हिरवा करून टाकू’ असं विधान केल्यानं वादाला तोंड फुटलंय. तसेच कैसा हराया असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा याठिकाणी जाऊन पहिल्यांदाच यावर भाष्य केलय. मुंब्रा याठिकाणी केलेल्या भाषणात ‘मुंब्र्यात कोणताही एक रंग चालणार नाही, इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल’ अशा शब्दांत आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, हाथी चले अपली चाल, कुत्ते भोके हजार म्हणत एमआयएमच्या विजयावर बोलताना आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. त्या दोन नेत्यांनी शरद पवारांचा विचार संपवला सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांचा विचार संपवला असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅनेज झाले आहेत असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते संजय पाटील घाटणेकर यांनी केलाय. माढा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्यानंतर घाटणेकर आक्रमक झाले आहेत. मोहिते पाटील आणि अभिजीत पाटील हे खासदार आमदार पवारांचा विचार संपवत असून ते आता पक्षाचे राहिले नाहीत. ते वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून आतून भाजपाला मदत करीत आहेत. हे देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे असून हे सर्व आपण शरद पवार यांच्या कानावर घातलं असल्याचे संजय पाटील घाटणेकर यांनी सांगितलंय. त्यांच्या या आरोपांमुळे आता राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडालीय. गिरीश महाजनांनी जाहीर लेखी माफी मागावी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आपल्या भाषण न घेतल्याने एकच गोंधळ निर्माण झालाय. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र आता गिरीश महाजनांनी दिलीगिरी व्यक्त केलीय, पण त्यांनी जाहीर लेखी माफी मागावी अशी मागणी आरोप करणाऱ्या वन विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव यांनी केलीय. गिरीश महाजन यांचे सुदैव आणि माझे दुर्दैव हे प्रकरण ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत बसत नाही. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी हे जाणून बुजून केले आहे. कारण, आपल्या भाषणात त्यांनी इतर महापुरुषांची नावे घेतली, छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या ह्रदयात आहेत, छत्रपती संभाजी महाराज यांचेही त्यांनी नाव घेतले. मात्र, बाबासाहेबांचे नाव त्यांनी घेतले नाही, असा आरोप माधवी जाधव यांनी केलाय. देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलय. राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या यांनी, मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा व संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून शासनाने महिलांसाठी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत जम्मू आणि काश्मीरमध्ये सततच्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. श्रीनगर विमानतळावरून येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. रस्ते आणि हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे जनतेची मोठी गैरसोय झाली. यामुळे आपत्कालीन सेवा आणि सशस्त्र दलांच्या हालचालींवरही परिणाम झाला. मंगळवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या सोनमर्ग याठिकाणी मोठा हिमस्खलन झाला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काश्मीर खोरे सततच्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे सामान्य जीवन विस्कळीत होत असताना हा हिमस्खलन झाला. मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यात रात्री १०:१२ वाजता ही घटना घडली. परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी भयानक फुटेज कैद झालीय, ज्यामध्ये डोंगरावरून बर्फाचा एक मोठा थर काही सेकंदात अनेक इमारतींना झाकून टाकताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये घबराट पसरलीय. रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं रशिया-युक्रेनमधील तणाव आता दिवसेंदिवस चिघळत चाललाय… अशातच रशियानं युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य करत विध्वसंक ड्रोन हल्ला केलाय.. युक्रेनमधील कूपियांस्कमध्ये दोन युक्रेनियन लष्करी तळांना ड्रोनने उद्धवस्त करण्यात आलेत…खैरसनमध्ये रशियाचा मोठा बॉम्बहल्ला झाल्याचं म्हटलं जातंय.रशियाकडून खार्किवमध्ये एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे उद्धवस्त झालीय. दरम्यान रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरात लागलेल्या आगी विझविण्यासाठी युक्रेनचे अग्निशमन दल जीवाची बाजी लावतय.. मात्र, रशियाकडून सातत्याने होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय.. अशातच आता रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यांना युक्रेन कसं प्रत्युत्तर देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अरिजीत सिंहचा गायक म्हणून निवृत्तीचा निर्णय Top 10 news : सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह याने त्याच्या चाहत्यांना धक्का देणारा निर्णय घेतलाय. त्याने यापुढे चित्रपटात गाणं न गाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली. अरिजीत सिंहने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत 300 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. आपण यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही असं अरिजितने सोशल मीडियावरुन जाहीर केलं. इतक्या वर्षात आपल्याला प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभारही मानले. पार्श्वगायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय करणार हे मात्र अरिजीतने स्पष्ट केलं नाही. अरिजीत ‘स्वतंत्र संगीत’ आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अरिजीत सिंगच्या या घोषणेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.