महापालिकांतील सत्तावाटपासाठी आज बैठक मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्तावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबईत शिवसेनेला अडीच वर्षे महापौरपद, उपमहापौर, स्थायी, सुधार, बेस्ट आदींपैकी काही समित्यांची अध्यक्षपदे मिळावीत, अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आदी महापालिकांबाबत एकत्रित निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. फडणवीस दावोसला गेल्यानं मुंबईसह अन्य महापालिकांमधील भाजप-शिवसेना (शिंदे) सत्तावाटप झालेलं नाही. त्यामुळ मुंबई महापालिकेतील भाजप व शिंदे गटातील नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणीही करण्यात आलेली नाही. पण आता फडणवीस मुंबईत परतल्याने राजकीय घडामोडींना वेग येणारय. निवडणूक आयोगाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले जाणार शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होत, मात्र आता याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय. पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. दावोस दौऱ्यावर टीका करणे अयोग्य, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. पण दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या दौऱ्यावर टीका करणे योग्य नसल्याचं म्हटलंय. परंतु , हे करताना त्यांनी करार झालेल्या कंपन्यांवरून मात्र सरकारला धारेवर धरलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर 30 लाख कोटींचे एमओयू झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूकयेणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर भाष्य केलंय. ‘हरा कर देंगे’ वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही एमआयएमने राज्यात 125 हून अधिक जागांवर यश मिळवलं असून मुंब्रा मधून पक्षाच्या सहर शेखनं राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनाच थेट टक्कर दिली. याठिकाणी सहर शेखसह 4 उमेदवार एमआयएमचे विजयी झालेत. मात्र, विजयानंतर तिने संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, असे सहर शेखनं आपल्या स्टाईलनं म्हटलं होतं. आता, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सहर शेखच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. तसेच, तिच्या वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. तसंच अनेक आमदार मुसलमान विरोधात बोलतात, त्यांच्यावर काय कारवाई केली? त्यांनी आणले त्यापेक्षा जास्त माणसे मी आणू शकतो. तुमची सत्ता आहे तर कानून तुमच्यासारखे चालणार का? मी विचारतो की कोणत्या नियमाखाली पोलिसांनी या लहान मुलीला नोटीस पाठवली? तिने जे स्टेटमेंट दिले त्यावरून आम्ही मागे हटणार नाही, ती जे बोलली त्याला आम्ही सपोर्ट करतो, अशी भूमिका देखील इम्तियाज जलील यांनी मांडली. शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून स्ट्रॉंग नेता म्हणून ओळख असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे 82 व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला, तेव्हा त्यांचा वेगळा लूक चर्चेचा विषय ठरला. वयाच्या 82 व्या वर्षी देखील तेवढ्याच उत्साहात प्रचारामध्ये सामील झाल्याचे दिसत आहे. डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप परिधान करून प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या विजय दादांचा स्वॅग पाहून अनेकांना त्यांच्या तरुणपणातील नेतृत्वाची आठवण झाली.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांची साथ देणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. उपमुख्यमंत्री महायुतीतून बाहेर पडणार? राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथीची चर्चा रंगलीय.आणि त्याला कारण ठरलंय.संजय राऊतांनी दिलेले सूचक संकेत. अजित पवार हे लवकरच सत्तेतून बाहेर पडून महाविकास आघाडीसोबत येतील, असं वक्तव्यच संजय राऊतांनी केलं आणि राज्यात एकच खळबळ उडालीय. खरंतर नगरपालिका निवडणुकीपासूनच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.. एवढंच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांनी भाजपवर घोटाळ्यांच्या आरोपांची ल़ड पेटवून दिली… त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादीने जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र आल्या आहेत..त्यासोबतच सध्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील एकदंरीत वातावरणावरून संजय राऊतांनी हा दावा केलाय. दरम्यान, संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन आहे, असा टोला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लगावलाय. राज्यातून थंडी गायब? राज्यात मकर संक्रांतीनंतर थंडी कमी झालेली पाहायला मिळतीय. किमान तापमानात सतत होणाऱ्या चढ उतारामुळे वातावरणातील गारठा काहीसा कमी झालाय. ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. आज राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळेल. पहाटेच्या वेळी धुके आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून, काहीसा उकाडा अनुभवायला मिळत आहे. किमान तापमानात वाढ कायम राहणार असून थंडी कमी – अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. ‘मी त्यांच्यापेक्षा असुरक्षित नेता कधीच पाहिला नाही’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांच्या राहुल गांधी यांच्यावरील विधानामुळे राजकीय गोंधळ उडालाय. शकील अहमद यांनी राहुल गांधींना पक्षाचे आभासी अध्यक्ष आणि सर्वात असुरक्षित नेता म्हणून संबोधलय. त्यांनी, “पक्षात जे नेते त्यांच्या विचारसरणीमुळे आणि तळागाळातील लोकांशी असलेल्या संबंधांमुळे मजबूत आहेत, त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ होतात. म्हणूनच काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना सातत्याने कमकुवत केले आहे. त्यांनी तळागाळातील नेतृत्वाला भरभराटीला येऊ दिले नाही.” असं म्हणत राहुल गांधींवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडं यामुळे भाजपला काँग्रेसवर हल्ला करण्याची संधी मिळालीय. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना पाहायला मिळतीय. काश्मीर खोऱ्याने पांढरी चादर पांघरलीय. गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर जोरदार हिमवृष्टी झालीय, सर्वत्र बर्फाची चादर पसरलीय. पर्यटनासाठीच्या या “गोल्डन डेज” मध्ये हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिकही सुखावलेत.जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी झालीय. गुलमर्गमध्ये दोन फुटांपेक्षा जास्त तर सोनमर्गमध्ये सहा इंच बर्फ साचलाय. खोऱ्यातील बडगाम, बारामुल्ला, कुपवाडा, शोपियां, पुलवामा आणि बांदीपुरा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये हलकी बर्फवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडाला धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरूय. यादरम्यान ट्रम्प यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतय. चीनबरोबर करार केल्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी कॅनडावर प्रचंड प्रमाणात टॅरिफ लादण्याची धमकी दिलीय. “जर कॅनडाने चीनबरोबर करार केला, तर अमेरिकेत येणारा सर्व कॅनेडियन माल आणि उत्पादनांवर तात्काळ १०० टक्के टॅरिफ लावले जाईल,” असं ट्रम्प सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हणालेत. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान कार्नी यांचा उपरोधकपणे गव्हर्नर कार्नी असा उल्लेख केलाय. यापूर्वी ट्रम्प यांनी अशाच प्रकारचा टोमणा कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांना देखील लगावला होता.