वरणासोबत भातही महागला!

तांदळालाही महागाईची झळ : महिनाभरात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी भाववाढ


आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली


मागणीच्या तुलनेत पुरवठ्यासाठी मालाचा तुटवडा

पुणे – परदेशात विशेषत: आखाती देशात निर्यात वाढल्याने आणि देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मागणी जास्त असल्याने तांदूळ चमकले आहे. मागणीच्या तुलनेत अपेक्षित पुरवठा होत नसल्याने तांदळाच्या भावात एका महिन्यात सुमारे 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. हीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असून, सध्या तरी तांदळाच्या भावात घट होण्याची शक्‍यता नसल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

गेल्या आठवड्यात मिळालेल्या माहितीनुसार, सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव कमालीचे वाढले असून डाळींच्या उत्पादनाला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. आता तांदूळही महागला असून सर्वसामान्यांच्या ताटातील वरणभाताची “लज्जत’ हरवत आहे. आखाती देशात रमजान ईद सणासाठी महिना-दीड महिना आधीच तांदळाची खरेदी करण्यात येते. त्यामुळे एप्रिलमध्ये तेथून बासमती तांदळाला मागणी होती. त्यामध्ये विशेषत: “1121′ जातीच्या बासमती तांदळाला मागणी होती. तेथे मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याने या तांदळाच्या भावात सर्वाधिक म्हणजे क्विंटलमागे एक हजार ते दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. याबरोबरच आंबेमोहर, लचकारी कोलम, सुरती कोलम या बिगर बासमती तांदळाचीही परदेशात मोठ्या प्रमाणात चलती आहे. या तांदळाच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

परदेशात अधिक प्रमाणात झालेली निर्यात आणि डॉलरच्या भावात झालेल्या वाढीमुळे तांदळाचे भाव तेजीत असल्याचे शहा यांनी सांगितले. ते म्हणाले, “डिसेंबरमध्ये तांदळाचा हंगाम सुरू होतो. मात्र, आता गव्हाचा हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षी वर्षभरासाठी लागणारे गहू आणि तांदूळ नागरिक एकत्रच खरेदी करत असतात. नागरिकांकडून आता तांदळाची खरेदी करण्यात येत आहे. त्याबरोबरच लग्नसराई, रमजानचे उपवास आणि मिलवाल्यांकडून तांदळाला मोठी मागणी आहे. त्या तुलनेत बाजारात तांदळाचा तुटवडा आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×