दुबआ : इराणने आज सरकारवर टीका करणाऱ्या एका लोकप्रिय गायकाची तुरुंगातून सुटका केली. माहसा आमिनी या युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर भडकलेल्या आंदोलनात गीताच्या माध्यमातून सरकारवर टीका केल्याप्रकरणी या गायकाला अटक करण्यात आली होती. तूमाज सालेही असे या रॅप गायकाचे नाव असून त्याने एक वर्षापेक्षा थोडा अधिक काळ तुरुंगात घालवला होता.
इराणमधील रिव्होल्युशनरी गार्डने त्याला देहदंडाची शिक्षा सुनावली होती. रिव्होल्युशनरी गार्डची सुनावणी सर्वसाधारणपणे बंद कक्षामध्येच होत असते आणि ज्याच्याविरुद्ध खटला चालवला जातो, त्याला फारच कमी वेळा बचावाची संधी दिली जात असते. त्यानुसार सालेही याच्याविरुद्धची सुनावणी देखील बंद कक्षातच झाली होती.
सालेही हा ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका झाली होती. त्यानंतर जून महिन्यात शिक्षेचा निर्णय बदलण्यात आला होता. रविवारी त्याला तुरुंगातून सोडण्यात आले, असे इराणमधून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
कलाकारांच्या अभिव्यक्तीला किती गंभीर धोका आहे, हेच या उदाहरणावरून दिसून येते, असे न्यूयॉर्कमधील आर्टिस्ट ऍट रिस्क कनेक्शन या गटाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सालेही याला पहिल्यांदा २०२२ मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केली गेली होती. त्याला जामीन मिळाला आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये पुन्हा तुरुंगात टाकले गेले होते. तुरुंगात त्याचा छळ देखील केला गेला होता.