पुणे – पीएमआरडीएने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये 800 ऐवजी 400 च बेड उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. एवढेच नव्हे, तर पुरेसे मनुष्यबळही याठिकाणी उपलब्ध नसल्याचे उघड झाले असून, त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. पुणेकरांना 800 बेडचे अद्ययावत रुग्णालय उपलब्ध झाल्यामुळे नि:श्वास सोडला होता. प्रत्यक्षात मात्र हे रुग्णालय म्हणजे फक्त “डोलारा’ असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी सध्या केवळ 400 बेडचे रुग्णालयच सुरू आहे. यामध्ये 300 ऑक्सिजन बेड, 30 एडीयू, 30 आयसीयू व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. हे हॉस्पिटल चालवण्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळही येथे नाही. 400 खाटांसाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, इतर कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
यंत्रणाही विस्कळीत
जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी वेळ लागत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची याठिकाणी कमतरता आहे. याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. महापालिका प्रशासनाने वारंवार हे रुग्णालय चालवणाऱ्या संस्थेला पत्र देवून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे आता महापालिका प्रशासनच मनुष्यबळासाठी इतर संस्थांच्या शोधात असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ज्या संस्थेकडून हे रुग्णालय चालवण्यात येत आहे, त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी त्यांची आहे. याविषयी दोनदा पत्र देण्यात आली आहे. ससूनमधील यंत्रणा बंद पडल्यामुळे याठिकाणी रुग्णांची संख्या वाढली. जम्बो कोविड सेंटरसाठी पीएमआरडीए प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आली आहे. पीएमआरडीएने त्यांच्याबरोबर करार केला असल्यामुळे त्यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे.
– विक्रमकुमार, महापालिका आयुक्त