वेलिंग्टन – हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आज तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरी पुसून काढण्याची सर्वात मोठी जबाबदारी पंड्याच्या खांद्यावर आली आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
संघात जास्तीत जास्त नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली असून त्यांच्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी या मालिकेद्वारे निर्माण झाली आहे. संघाची फलंदाजी खुद्द पंड्या व भरात असलेला सूर्यकुमार यादव यांच्यावर जरी प्रमुख मदार असली तरीही इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.
रवी शास्त्रींची राहुल द्रविड यांच्यावर टीका; म्हणाले,”एवढ्या विश्रांतीची काय…”
गोलंदाजीत अनुभवाची कमतरता दिसत असली तरीही नवोदित अर्शदीप सिंगवरच प्रमुख मदार राहणार आहे. त्याच्या जोडीला अनुभवी भुवनेश्वर कुमार व महंमद सिराज आहेतच. तसेच आयपीएल स्पर्धा गाजवणारा व प्रचंड वेगाने गोलंदाजी करणारा उमरान मलिक याच्यासह हर्षल पटेललाही आपला दर्जा सिद्ध करण्यासाठी मोठे व्यसपीठ या मालिकेद्वारे मिळाले आहे. संघात ऋषभ पंतही आहे व तो कशी कामगिरी करतो याकडेही लक्ष राहणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत फारशी संधी मिळाली नसल्याने त्यालाही संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठी या मालिकेत सरस कामगिरी करावी लागणार आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही यशाच्या शोधात आहे. विश्वकरंडक स्पर्धेत त्यांच्या हाती फारसे यश लागले नसल्याने किमान मायदेशात होत असलेल्या या मालिकेत यश मिळवत देशवासीयांना आनंद देण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. संघाचे नेतृत्व कायम अपयशी ठरूनही केन विल्यमसनकडे कायम ठेवले गेले आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील संघात फार बदल केले गेले नसले तरीही काही खेळाडूंना या मालिकेत चमक दाखवावी लागणार आहे.
न्यूझीलंड संघाची फलंदाजी फिन ऍलेन, डेव्हन कॉनवे, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स निशाम व टॉम लॅथम यांच्यामुळे सशक्त आहे. गोलंदाजीतही त्यांच्याकडे टीम साऊदी, मिचेल सॅन्टनर, इश सोधी, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन व नवोदित ब्लेअर टिक्नेर असा चांगला ताफा आहे. मुळातच सध्या हिवाळ्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजंना स्विंग मिळेल याची खात्री आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून थेट न्यूझीलंडला दाखल झालेल्या भारतीय संघातील फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत या अचूक स्विंगचा सामना करावा लागणार आहे.
उमरानवर लक्ष
आयपीएल स्पर्धा गाजवणारा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. सध्याच्या काळात भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज अशी ख्याती असलेल्या उमरानने आयपीएल स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने अनेक समीक्षकांना आपली दखल घ्यायला लावली होती. त्यामुळे या मालिकेत सरस कामगिरी करत भारतीय संघातील स्थान पक्के करण्याची त्याला संधी मिळाली आहे.
उद्या पहिला टी-20 सामना
ठिकाण – स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
वेळ ः भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 पासून
थेट प्रक्षेपण – डीडी स्पोर्टस