पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – किरकोळ बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या भावात आता घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. आवक वाढल्याने आठवडाभरात टोमॅटोचे भाव निम्माहून कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोची ४० ते ५० रुपये किलो भावाने विक्री होत आहे.
टोमॅटोच्या भावात जुलैमध्ये टप्याटप्याने वाढ होत गेली. मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी हाेत असल्याने भावात वाढ झाली. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे भाव शंभर रुपयांपर्यंत गेले होते. नवीन लागवड केलेला टोमॅटो बाजारात उपलब्ध झाला नव्हता. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे, मुंबईतील बाजारात पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरातून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविले जातात. घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली होती. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात चार ते पाच हजार पेटी टोमॅटोची आवक व्हायची.
पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. सध्या दररोज १० ते १२ हजार पेटी आवक होत आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घसरण झाली असून, यापुढील काळात टोमॅटोच्या दरात फारशी वाढ होणार नाही, असे भुजबळ यांनी नमूद केले.
टोमॅटोचे भाव
घाऊक बाजार – १०० ते २०० रुपये (दहा किलो)
किरकोळ बाजार- ४० ते ५० रुपये (एक किलो)