नाक्‍यावर “टोल’, त्यात पोलिसांचा “झोल’

सुरेश डुबल
कराड – देवळात महादेवाचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. असाच प्रकार कराड तालुक्‍यातील तासवडे टोलनाक्‍यावर होतोय. टोल भरण्यापूर्वी किंवा टोल भरल्यानंतर वाहनधारकांना पोलिसांच्या “झोल’चा सामना करावा लागतोय. वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून “वरकमाई’ केली जात असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.

दळणवळणासाठी रस्ते चांगले असल्यास राज्याचा, पर्यायाने देशाचा विकास होतो. मात्र, तासवडे टोल नाक्‍यावर उभे राहणारे महामार्ग पोलीस व्यक्‍तिगत विकास साधताना दिसत आहेत. महामार्गावर अवैध गोष्टी घडून येत यासाठी वाहनांची तपासणी गरजेची आहे; परंतु तपासणीच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरून घेणे हा कुठला न्याय, अशी तीव्र प्रतिक्रिया महामार्गावरून जाणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांमधून उमटत आहे.

एखाद्या वाहनाचा संशय आल्यास त्याची तपासणी पोलिसांनी अवश्‍य केली पाहिजे. मात्र, दंडाच्या पावत्या फाडण्यासाठी आणि स्वत:चे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्यांना टार्गेट केल्याने महामार्ग पोलिसांना भविष्यात प्रवाशांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.
डिझेल, पेट्रोलची दररोज होणारी भाववाढ, रस्त्यांची दुरवस्था, अवाजवी टोलवसुली यामुळे त्रस्त असलेले वाहनधारक व प्रवासी पोलिसांच्या जाचाला वैतागले आहेत.

तासवडे टोलनाक्‍यावर टोल भरण्यापूर्वी आणि टोल भरल्यानंतर वाहनांची गती मंदावलेली असते. त्यामुळे टोलनाक्‍यावर वाहन आले की, टोल भरण्यापूर्वी किंवा भरल्यानंतर चार-पाच पोलीस वाहनाला आडवे येतात. काहीही करून दंडाची पावती फाडायची असल्याने पोलीस वाहनचालकाची काही तरी चूक काढतात. वाहनचालकांना भरमसाठ दंडाचा आकडा सांगितला जातो.

त्यानंतर वाहनचालकाचा अंदाज घेऊन दंडाची पावती करायची की, आपल्या तुंबड्या भरायच्या, हे ठरवले जाते. वाहनचालकांना त्याच्या कामाच्या, मुक्‍कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचायचे असल्याने ते पोलिसांच्या नादाला न लागता, त्यांच्या हातावर चिरीमिरी ठेवून निघून जातात. मग, आपल्याला कोणी पाहत नाही ना, हे पाहून पोलीस पैसे खिशात घालतात आणि पुढचे सावज पकडायला सरसावतात. हे प्रकार तासवडे टोलनाक्‍यावर सर्रास पहायला मिळत आहेत.

मुळात महामार्ग पोलीस पथकाचे प्रमुख काम वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आहे. नावातच महामार्ग पोलीस, अस स्पष्ट उल्लेख आहे, तरी त्याला हरताळ फासून तासवडे टोलनाक्‍याच्या दोन्ही बाजूस दंड वसूल करणे व कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांची लूट करण्याचा कार्यक्रम सर्रास राबविला जात आहे.

महामार्गावर एखादा अपघात झाल्यास सर्वप्रथम मदत पोहोचवणे व वाहतूक पूर्ववत करणे, महामार्गावर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीस अडथळा ठरेल अशा ठिकाणी लक्ष ठेवणे, दूरच राहते, मात्र एखादे झाड किंवा कोपरा धरून पावत्या फाडण्यात व वाहनधारकांना त्रास देण्याची मजा पोलीस लुटतात. त्यामुळे महामार्ग पोलिसांबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये संतापाची भावना होत आहे. याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नसावी. वरिष्ठांनी वस्तुस्थिती समजून घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अपघाताची माहिती मोबाईलवरूनच
काही कारणाने टोलनाक्‍यावर वादवादी झाल्यास त्यात हस्तक्षेप न करता महामार्ग पोलीस चुपचाप निघून जातात. महामार्गावर एखादा अपघात झाल्यावर घटनास्थळी जाण्याऐवजी मोबाईलवर माहिती घेण्यात पोलीस धन्यता मानत असल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी कर्तव्य करावे
महामार्ग पोलिसांचे महत्त्वाचे काम गस्त घालण्याचे आहे. त्यामुळे त्यांनी टोलनाक्‍यावर न थांबता नेमून दिलेल्या हद्दीत फिरणे आवश्‍यक पाहिजे. सरसकट वाहने तपासणीसाठी न थांबवता संशय येणारी वाहने थांबवून तपासणी केली पाहिजे. पोलिसांनी आपले कर्तव्य चोख पार पाडावे, अशी माफक अपेक्षा जनतेतून व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.