पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर डिसेंबर 2021 मध्ये दररोज सुमारे 10 हजारांहून अधिक वाहने टोल न देता प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये टोल चुकवणाऱ्या बस, ट्रक, व्यावसायिक वाहने असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासह या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नागरिकांकडून चार ठिकाणी टोल आकारण्यात येतो. रुग्णवाहिका, पोलीस वाहने, सैन्याची वाहने, आमदार, खासदार आदींच्या वाहनांना टोलमधून सूट दिली जाते. मात्र महामार्गावर दररोज हजारो वाहने टोल न भरता प्रवास करत आहेत. याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सूट असणारी वाहने आणि उल्लंघन करणाऱ्या वाहनांची स्वतंत्र माहिती देण्याची आणि टोल चुकवण्याच्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
2016 मध्ये मी मुख्य माहिती आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवरून त्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोल नाक्यांवरून रोज किती आणि कोणती वाहने जातात याची संख्या, टोलच्या रकमेची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर 2021 मध्ये एकूण 3 लाख 30 हजार 797 वाहनांनी टोल न भरता महामार्गावरून प्रवास केला. यामध्ये सूट असणाऱ्या आणि टोल चुकवणाऱ्या वाहनांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे.
दररोज दहा हजारांहून अधिक सूट असणारी वाहने असल्याची शक्यता शून्य आहे. यासह यामध्ये बस – 1,850, ट्रक – 5,193, मल्टीऍक्सल – 5,086, एलसीव्ही- 20,196 या संवर्गातील वाहनांचा समावेश सूट दिलेल्या वाहनांमध्ये असू शकत नाही. त्यामुळे हे सगळे संशयास्पद वाटते. मात्र, कंत्राटदाराने दिलेली आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना अधिकाऱ्यांना काही वावगे वाटत नाही, हे आश्चर्यकारक आहे, असे वेलणकर यांनी पत्रात नमूद केले आहे.