लाहोर : टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंग झाले आहे. गुरुवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा पराभव केला. दरम्यान, संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करत संघाचे सांत्वन केले. यावेळी खेळाडूंच्या काय भावना असतील याची आपल्याला जाणीव असून आपल्या खेळीवर त्यांना अभिमान वाटला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने इम्रान खान यांना टोला लगावला आहे.
To Babar Azam & the team: I know exactly how all of you are feeling right now bec I have faced similar disappointments on the cricket field. But you shd all be proud of the quality of cricket you played & the humility you showed in your wins. Congratulations Team Australia.
— Imran Khan (@ImranKhanPTI) November 11, 2021
“बाबर आझम आणि संघासाठी: तुम्हाला काय वाटत असेल याची मला कल्पना आहे कारण क्रिकेटच्या मैदानावर मला अशा निराशेचा सामना करावा लागला आहे. पण तुम्ही ज्याप्रकारे दर्जात्मक क्रिकेट खेळला आहात आणि विजयातदेखील नम्रता दाखवलीत त्याचा तुम्हा सर्वांना अभिमान असेल. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन”, असे ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.
خان صاحب آپکو کہا بھی تھا کہ فائنل دیکھنے کی ضِد نہ کریں
— Reham Khan (@RehamKhan1) November 11, 2021
तर दुसरीकडे पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान यांची पत्नी रहीं रेहम खान यांनीदेखील ट्वीट केलं आणि टोला लगावला. “खानसाहेब अंतिम सामना पाहण्याचा हट्ट करु नका,” असे सांगितले होते असा टोला त्यांनी यावेळी ट्वीटमधून लगावला. रेहम खान ब्रिटीश-पाकिस्तानी पत्रकार आहे. इम्रान खान आणि रेहम खान २०१४-१५ दरम्यान पती-पत्नी होती. लग्नानंतर लगेचच त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.
टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही सामना न हारता उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तान संघाची विजयी घोडदौड अखेर ऑस्ट्रेलियाने रोखली आहे. मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.