टोकियो -टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होण्यास काहीच दिवसांचा अवधी बाकी असतानाच करोनाचा धोकाही वाढत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी एका खेळाडूला स्पर्धेच्या क्रीडाग्राममध्ये करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता आणखी दोन खेळाडूंनाही करोनाची बाधा झाली असून, एकूण बाधित खेळाडूंची संख्या तीन झाली आहे.
या तीनही खेळाडूंना 14 दिवसांच्या विलगीकरणात पाठवले गेले असून, हा कालावधी संपल्यावर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. मात्र, आता हे खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालणार असून, या खेळाडूंचा विलगीकरण कालावधी 1 ऑगस्टला संपेल. मात्र, तोपर्यंत स्पर्धा अखेरच्या टप्प्यावर असेल.
येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनांबद्दल पुन्हा एकदा संशयाचे ढग जमा झाले आहेत.
बाधित खेळाडूंची नावे आयोजकांनी जाहीर केलेली नाहीत. आयोजन समितीने जाहीर केलेल्या करोनाग्रस्तांच्या यादीनुसार दिवसभरात एकूण 10 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात पाच व्यक्ती क्रीडाक्षेत्राशी संबंधित असून एक कंत्राटदार आणि एक पत्रकार आहे. खेळाशी संबंधित करोना प्रकरणांची संख्या आता 55 झाली आहे.
नायजेरियाच्या खेळाडूंचे पथक नारिटा विमानतळावरून टोकियोला रवाना होणार होते. पथकातील एक सदस्य करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्यक्तीला सौम्य लक्षणे होती, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.