Tokyo Olympics | जपानच्या नागरिकांचा स्पर्धेला विरोध वाढला

टोकियो – करोनाच्या सावटाखाली आयोजित होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना जपानच्या नागरिकांचा विरोध प्रचंड वाढला आहे. जपान संयोजन समिती व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या स्पर्धेला 10 हजार प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नागरिकांनी ही स्पर्धा जपानसाठी धोकादायक ठरणार असल्याचे सांगत विरोध कायम ठेवला आहे.

देशात या स्पर्धेचे सामने ज्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये होणार आहेत. तेथील प्रेक्षकक्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक संयोजन समिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपान सरकार आणि टोकियो शहर प्रशासन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

करोना साथीच्या काळात ऑलिम्पिकच्या आयोजनावरही आता टीकेचा जोर वाढला आहे. येत्या 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी परदेशी प्रेक्षकांना मज्जाव करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेण्यात आला आहे. जवळपास 35 लाख तिकिटे जपानमधील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रेक्षकांना परवानगी देण्याच्या निर्णयास पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही अनुकूलता दर्शवली आहे.

स्पर्धा म्हणजे जीवाशी खेळ

जपानमधील एका सर्वेक्षणात 83 टक्‍के नागरिकांनी ऑलिम्पिकमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे म्हटले आहे. यापैकी 53 टक्के नागरिकांनी प्रेक्षकांविना ऑलिम्पिक व्हावे असा कौल दिला आहे, तर प्रेक्षकक्षमता मर्यादित असावी, असेही सांगताना ही स्पर्धा म्हणजे जीवाशी खेळ असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.