Tokyo Olympics: मिराबाईच्या पदकाचा रंग सोनेरी होणार

चीनच्या सुवर्णपदक विजेतीची होणार डोप टेस्ट

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या मिराबाई चानूला सुखद धक्‍का मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेत चीनच्या झीयू हौ हिने सुवर्णपदक पटकावले होते मात्र, आता तिची डोपिंग चाचणी होणार असून त्यात जर ती दोषी आढळली तर मिराबाईच्या पदकाचा रंग सोनेरी होणार आहे.

महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मिराबाईपेक्षा सरस कामगिरी करत चीनच्या झीयूने सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, तिची डोपिंग चाचणी होणार असल्याने मिराबाईला सुखद धक्‍काही मिळू शकतो. झीयू डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मिराबाईचे रजतपदक सुवर्णपदकात परावर्तीत होणार आहे.

असे घडले तर ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मिराबाई चानू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. मिराबाईने 49 किलो वजनी गटात रजतपदक मिळवले होते. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रजतपदक जिंकताना इतिहास रचला होता. तिने एकूण 202 किलो वजन उचलले होते. तसेच तिने 87 किलो स्नॅच प्रकारात तर 115 किलो क्‍लीन ऍण्ड जर्क प्रकारात वजन उचलले.

वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूने मिळवलेले हे दुसरे पदक ठरले. चानूने भारताच्या 29व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. करनाम मल्लेश्‍वरीने 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूने मिळवलेले हे दुसरे पदक ठरले आहे. तर भारतीय खेळाडूने पटकावलेले हे 18 वे वैयक्‍तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारताच्या महिला खेळाडूने प्ताप्त केलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.

प्रशिक्षक बनण्याची शक्‍यता

मिराबाई चानू टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याने रातोरात स्टार बनली आहे. मात्र, तिने स्वतः हे स्टारडम नाकारले असून भारताला भविष्यात अनेक गुणवान खेळाडू देण्यासाठी सज्ज राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळेच ती पुढील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची शक्‍यता संपूष्टात आली असून ती प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.