टोकियो – भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या टेनिस स्पर्धेत बलाढ्य प्रतिस्पर्धी रशियाच्या डॅनियल मेदवेदेवला चांगली लढत दिली. सुमित जरी हरला असला तरीही त्याने केलेल्या खेळाचे कौतुक खुद्द मेदवेदेवनेही केले. त्याच्या पराभवामुळे भारताचे ऑलिम्पिक टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
गेल्या 25 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दाखल होत सुमित अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरण्याचा मानही मिळवला होता. मात्र, मेदवेदेवसमोर त्याचा निभाव लागला नाही व त्याला हा सामना 6-2, 6-1 असा गमवावा लागला.
पुरुष एकेरीच्या स्पर्धेत सुमितच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपले असून, महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अंकिता रैना जोडीलाही पराभवाचा सामना करावा लागला होता. सुमितने 25 वर्षांनंतर म्हणजेच 1996 सालातील लिएंडर पेसनंतर ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचणारा पहिला खेळाडू ठरण्याचा मान मिळवला होता.
दुसऱ्या फेरीतील या सामन्यात मेदवेदेवने पहिला सेट 6-2 असा जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेटही 6-1 असा जिंकत आगेकूच केली. सुमित या सामन्यात पराभूत झाला तरी त्याने आपल्या खेळाने मेदवेदेवलाही प्रभावित केले.