टोकियो – करोनाचा धोका असल्याने लांबणीवर टाकण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही याबाबतचे कवित्व अखेर संपुष्टात आले असून आयोजकांकडून स्पर्धेचे अधिकृत काउंटडाऊन सुरू करण्यात आले आहे. तसेच अनेकदा स्थगित केलेली क्रीडाज्योतीची फेरी संपूर्ण देशभरात लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असला तरीही या स्पर्धेबाबतचे सर्व अडथळे दूर झाले असून संयोजन समिती नव्या जोमाने कार्यरत झाली आहे. जपान सरकार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना व जपान ऑलिम्पिक संघटना यांनी या स्पर्धेला प्रचंड यश मिळेल व स्पर्धेच्या फेरनूतनीकरणाचेही काम वेळापत्रकानुसार पूर्ण होणार असे सांगितले आहे.
स्पर्धेच्या या सर्व खर्चाचा तिढा सुटला असून ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीची फेरीही लवकरच देशभरात विविध शहरांमध्ये दाखल होणार आहे. ही ज्योत फुकुशिमा येथून 10 हजार खेळाडूंच्या सहभागाने एखाद्या रॅलीसारखी सुरू होणार आहे.
अर्थात, करोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना क्रीडाज्योतीच्या प्रवास मार्गावर उभे राहण्यापासून रोखले जाणार आहे. 121 दिवस क्रीडाज्योतीची फेरी होणार आहे. एकूण 859 शहरांमध्ये ही ज्योत फिरवली जाणार आहे. सध्या टोकियोत ही ज्योत प्रमुख स्टेडियमवर प्रज्वलितही करण्यात आली आहे.