कोकणाला Tokte वादळाचा जबरी फटका; फळबागा आडव्या

सिंधुदुर्ग/रत्नागिरी – अरबी समुद्रातील तोक्‍ते चक्रीवादळाचे कोकणांत होत असलेले गंभीर परिणाम स्पष्ट होत आहेत. या वादळामुळे समुद्राला उधाण आले. 80 ते 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छप्पर उडाली. फळबागा जमीनदोस्त झाल्यात. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. मोठ्या भागातील विज खंडीत झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेले. आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरी पत्रे देखील उडून गेले.

जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला असून नेटवर्कला देखील समस्या येत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांवरती झाडे देखील उन्मळून पडली आहेत. देवरूखमधील एका घरावर झाड कोसळले मात्र जीवितहानी झाली नाही.

पाच वाजल्यानंतर किंवा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नेमकं नुकसान आणि परिस्थिती समोर येण्यास सुरवात झाली.मात्र त्यानंतरही सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात सुमारे 2 हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

हे चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळपासून घोंगावत होतं. रेडी ते विजयदुर्ग या 120 किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. ढ़जिल्ह्यात 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडे पडल्यामुळे बंद आहेत. तर घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसळल्या. जिल्ह्यात 100 ते 110 घरांचे नुकसान झाले. उद्याही जिल्ह्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व समुद्र खवळलेला राहील.

जिल्ह्यात रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

मालवण तालुक्‍यात ठिकठिकाणी झाड चक्रीवादळामुळे झाड रस्त्यावर पडलीत तर विजेचे खांबही रस्त्यावर पडल्यामुळे रस्ते बंद झालेत तर विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तिकडे सावंतवाडी तालुक्‍यात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे छत कोसळून नुकसान झाले.

कणकवली तालुक्‍यालाही तोक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. कणकवली तालुक्‍यातील अनेक घरांवर झाडे पडली. कुडाळ तालुक्‍यातील ग्रामीण भागात तोक्ते चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला असून अनेक घराची छप्पर वाऱ्यामुळे उडून गेली. काही घरांवर झाड कोसल्यामुळे घरांचे नुकसान झाले.
तोक्ते चक्रीवादळाचा तडखा वैभववाडी तालुक्‍यातील सडूरे-शिराळे गावाला बसला आहे. अनेक घरांची कौले, पत्रे उडून गेल्याचे चित्र दिसत आहे तसेच काही आंबा, काजू, बागायतदारांचे कलम झाडे , फणस पडलेले आहेत. चक्रीवादळाच्या तडाखा तालुक्‍यातील अनेक काजु बागायदारांचे नुकसान झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.