तौक्‍ते वादळाचा पुणे जिल्ह्यातही जोरदार तडाखा; खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान

निसर्ग चक्रीवादळातही या गावांमधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते

राजगुरुनगर – करोनाशी लढा सुरु असताना आता खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील भोरगिरी, भिवेगाव परिसरात नागरिकांच्या घरांना शनिवारी (दि. 15) तौक्‍ते वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. यात घर, शाळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या जोरदार वादळात भिवेगाव येथील नव्याने बांधलेल्या शाळेचे आणि भोरगिरी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड उडून गेले. तर भोरगिरी येथील ग्रामपंचायत इमारतीचे छत उडाले आहे.

भोरगिरी येथील एका ग्रामस्थाचे संपूर्ण घर पडल्याने 100 टक्‍के तर दोन्ही गावातील 87 घरांचे नुकसान झाले आहे. त्यात 15 घरांचे 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. इतर घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

एकीकडे करोनाचे संकट असल्याने घर खर्चाला पदरमोड नाही तर दुसरीकडे आता वादळाने घराचे नुकसान झाल्याने घरे दुरुस्त कशी करायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागील वेळी आलेल्या निसर्ग वादळातही येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान झाले होते तर विजेचे खांब पडल्याने अनेक दिवस ही गावे अंधारात होती. करोनाच्या संकट काळातच अस्मानी वादळाचे संकट आल्याने आदिवासी भागातील नागरिक भयभीत झाला आहे.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरांचे नुकसान झाल्याने दुरुस्ती कशी करायची हा प्रश्‍न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी भोरगिरी, भिवेगाव गावातील नागरिक करीत आहेत. अजूनही वादळाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

भोरगिरी, भिवेगाव येथील शाळा, घरांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण चांभारे, प्रांताधिकारी विक्रम चव्हाण, बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश कानडे, तालुका शिक्षणधकारी संजय नाईकरे,

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुखदेव तात्या पानसरे आदींनी भोरगिरी भिवेगाव गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

भोरगिरी भिवेगाव येथे वादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्कल, तलाठी, ग्रामसेवकांनी तात्काळ पंचनामे करून मदत करण्याचे आदेश दिले आहेत. वादळ दोन दिवस राहणार असल्याने गावातील नागरिकांना तात्पुरते सुरक्षीत स्थलांतरासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.