सौदीतील आजची स्त्री!

एक वर्षापूर्वी रियाध या सौदी अरेबियाच्या राजधानीच्या शहरात स्त्रियांच्या हक्‍कांसाठी निदर्शने करणाऱ्या सात जणांना तेथील पोलिसांनी अटक केली. जगातील हा एकमेव देश होता, जिथे स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी नव्हती. त्यानंतर 24 जून 2018 ला सौदीच्या राजेसाहेबांनी एक आदेश काढून स्त्रियांनी वाहन चालवण्यावर त्या देशात असलेली बंदी उठवली. त्या दिवशी काही सौदी स्त्रियांनी रस्त्यावर एकटीने अथवा कोणा नातेवाईकांबरोबर गाडी चालवून या घटनेचा आनंद साजरा केला. त्याच्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या.

या घटनेस आता एक वर्ष झाले. मात्र, अठरा सालच्या मे महिन्यात अटक केलेल्या स्त्रिया अजूनही तुरुंगातच आहेत. स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रीवादी चळवळीच्या अग्रणी हातून अल्‌ फसी यांना सौदी सरकारने अटक केली आहे. फसी यांनी दोन हजार साली “प्राचीन स्त्री इतिहास’ या विषयात ब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवली. “स्त्रिया आणि इस्लाम’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून या विषयावर त्यांनी पाश्‍चात्य देशांमधे व्याख्याने दिली आहेत. तसेच कतार विद्यापीठातही त्यांनी या विषयाचे अध्यापन केले आहे. स्त्रियांना गाडी चालवण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी बंड करून स्वतः मोटार चालवली होती. वाहन चालवणाऱ्या त्या सौदीतील पहिल्या महिला ठरल्या होत्या. सौदी सरकारने एकीकडे तशी परवानगी देऊन स्त्री चळवळीचे यश अधोरेखित केले; पण दुसरीकडे फसी व इतर कार्यकर्त्यांना अटक करून देशातील स्त्रियांचे आवाज आपण अशा पद्धतीने दाबूनही टाकू शकतो, असा संदेश दिला आहे. सौदी सरकारने त्यांच्यावर परकीय शक्‍तींशी हात मिळवून देशद्रोह केल्याचे गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे वाहन चालवायची परवानगी मिळाली तरी सौदी अरेबियातील व्यापक स्त्रीहक्‍कांच्या लढ्यात तेथील स्त्रियांना अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, हेही स्पष्ट झाले.

सौदी अरेबियातील स्त्रियांवर अजूनही अनेक बंधने आहेत. त्या देशातल्या कायद्याप्रमाणे, स्त्रिया नेहमीच कोणा एखाद्या पुरुषाच्या पालकत्वाखाली असतात. सतत बुरख्यात वावरावे लागते. इतकेच नव्हे तर काही कारणाने बाहेरच्या देशातील स्त्रिया सौदी अरेबियामधे आल्या तरी त्यांनाही बुरखाच वापरावा लागतो व तेथील सगळे नियम पाळावे लागतात. आश्‍चर्य म्हणजे भारतात स्त्री साक्षरतेचे प्रमाण 65 टक्‍के आहे तर सौदी अरेबियात ते 79 टक्‍के आहे. म्हणजे स्त्रिया सुशिक्षित, कार्यक्षम असल्या तरी शेवटी त्यांना त्यांच्या गुणांचा उपयोग करण्यासाठी स्वातंत्र्य मिळणे हे शेवटी पुरुषांच्याच मर्जीवर आहे.

तिथल्या बायका आता गाडी चालवू शकतात हे खरे; पण पुरुषाच्या परवानगीशिवाय त्यांना “प्रवास’ करता येत नाही. यामुळे नवशिक्षित तरुणींचा कोंडमारा होतो. त्यातलीच एक म्हणजे रहाफ ही सौदी मुलगी. अलीकडेच सौदीमधील काचणाऱ्या बंधनांना कंटाळून, रहाफ ही एकटीच सौदी सोडून बाहेर पडली व कुवेतवरून बॅंकॉकला आली. तिला कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा कोणत्यातरी स्वातंत्र्यवादी देशात जायचे होते. ती पळून आल्याच्या संशयाने रहाफला अटक करण्यात आली. थायलंडच्या लोकांनी तिला परत पाठवण्याची तयारीही केली, पण तिने सोशल मीडियाचा वापर करून सर्व जगापुढे स्वतःचा प्रश्‍न मांडला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तिच्या प्रश्‍नाची दखल घेतली गेली. सध्या कॅनडा सरकारने रहाफला आश्रय दिला आहे. अन्यथा सौदी अरेबियाला ती जर परत गेली असती तर तिच्या कुटुंबीयांनीच तिला ठार केले असते, असे तिचे म्हणणे आहे.

भविष्यात अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर उत्पन्नाच्या स्रोतांचे विकेंद्रीकरण करणे भाग आहे हे सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान या नवीन पिढीच्या नेत्याच्या लक्षात आले आहे. स्थलांतरित लोकांऐवजी स्थानिक नागरिकांचा नवा उद्योग आणि नोकऱ्यांत अधिकाधिक सहभाग असावा असाही विचार यात आहे. त्यासाठी अर्ध्या जनसंख्येला म्हणजे स्त्रियांना रोजगारामधे जास्त संख्येने सामावून घ्यावे लागेल. स्त्रियांनी नोकऱ्या कराव्यात हे ध्येय जर साध्य करायचे असेल तर त्यांच्या प्रवासावरील बंधने काढावी लागतील. स्त्रियांना वाहन चालवण्याचा परवाना देणे, हे त्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. स्त्रियांच्या हक्‍कांसाठी लढणाऱ्या नेत्यांना तुरुंगातच ठेवून सौदी सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे सुधारणा नसून ती त्यांची गरज जास्त आहे आणि म्हणूनच या राजेसाहेबांनी स्त्रियांना शिक्षणाचेही स्वातंत्र्य दिले आहे. त्या त्यांचा व्यवसायदेखील सुरू करू शकतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी स्त्री एकटी फिरू शकत नाही. तिच्याबरोबर एखादा पुरुष असणे बंधनकारक आहे. अर्थात असे जरी असले तरी स्त्रियांचे हक्‍क मिळवण्यासाठी केलेला लढा काही प्रमाणात तरी यशस्वी होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. यातूनच पुढे नव्या चळवळी उभ्या राहतील. नव्या हक्‍कांसाठी लढे देण्याची प्रेरणा, सौदीमधील व इतर देशातीलही स्त्रियांना मिळू शकेल.

– माधुरी तळवलकर

Leave A Reply

Your email address will not be published.