Top 10 News : १) पुरावे नष्ट करण्यासाठी मनिषा हवालदारची मोठी खेळी नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या प्राध्यापिका मनिषा हवालदार हिने पुरावे नष्ट करण्यासाठी मोठे प्लॅनिंग केल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आलीय. फिजिक्स विषयाचे प्रश्नसंच असलेल्या नोट्स जाळून टाकत तिने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच बायोलॉजी प्राध्यापिका मनिषा मांढरेसोबतचे चॅटही डिलीट केल्याचे उघड झाले आहे. पतीच्या मोबाईलवरून प्रश्नसंच पाठवल्याचाही संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुण्यातील तीन ‘मनिषा’ नावाच्या महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यातील संबंधांचाही तपास सुरू आहे. सीबीआयचा तपास आता आणखी मोठ्या आरोपींपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २) संसद रत्न पुरस्कार जाहीर! श्रीकांत शिंदे, निशिकांत दुबे यांच्यासह १२ खासदारांचा गौरव यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी १२ खासदार आणि ४ संसदीय समित्यांची निवड करण्यात आलीय. भाजपचे जगदंबिका पाल, पी. पी. चौधरी, निशिकांत दुबे तसेच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी यांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मान मिळणार आहे. उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल कृषी, वित्त, ग्रामीण विकास आणि कोळसा-खाण समित्यांचाही गौरव होणार आहे. संसदेत पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांना बळ देण्यासाठी २०१० पासून हा पुरस्कार दिला जातोय. ३) राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा : दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे यांनी राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केलंय. काही जिल्ह्यांमध्ये डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या असून हाणामारीच्या घटनाही घडत आहेत. जळगावमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी स्वतः पेट्रोल पंपांची पाहणी केली. तर बुलढाण्यात गर्दी आणि वाद टाळण्यासाठी एका पेट्रोल पंपावर ग्राहकांना कूपन वाटप करून इंधन वितरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, शेतीकामासाठी डिझेल मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ४) ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत अण्णा हजारेंचा सरकारला सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला दिलाय. झुरळ हे नाव योग्य नसले तरी या पक्षामागे देशातील तरुण मोठ्या प्रमाणात उभा राहत असल्याचे त्यांनी म्हटले. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. सरकारने त्यांच्या आवाजाचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे अण्णा हजारे म्हणाले. दरम्यान, पक्षाचे सोशल मीडिया अकाऊंट आणि अधिकृत वेबसाईट बंद करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी झुरळे कधीच मरत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली. तसेच लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरूनही अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केलीय. ५) बंगालमध्ये घुसखोरांविरोधात मोठी कारवाई सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांविरोधात मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष “होल्डिंग सेंटर” उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ओळख पटेपर्यंत आणि डिपोर्ट प्रक्रियेपर्यंत पकडलेल्या परदेशी नागरिकांना या केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. विशेषतः बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांवर सरकारचे लक्ष केंद्रित असणार आहे. विधानसभा निवडणुकीत घुसखोरी हा भाजपाचा प्रमुख मुद्दा होता. सत्तेत आल्यानंतर “Detect, Delete and Deport” धोरण राबवण्यास सुरुवात केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. ६) पुढील वर्षभरात मोदी पदत्याग करतील; राहुल गांधींचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत मोठे राजकीय विधान केले. आगामी वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पदत्याग करतील, असा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. देशाची आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती आणि देशांतर्गत वाढता असंतोष यामुळे ही परिस्थिती निर्माण होईल, असे राहुल गांधी म्हणाले. बैठकीत ‘मुस्लीम’ शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ शब्द वापरण्याच्या सूचनेलाही त्यांनी विरोध केला. अन्यायग्रस्त कोणत्याही समाजासाठी काँग्रेसने उघडपणे आवाज उठवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. ७) पाकिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; २४ हून अधिक जवानांचा मृत्यू पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर भीषण बॉम्बहल्ला झाल्याची घटना घडलीय. बलुच लिबरेशन आर्मीने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्फोटात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की इंजिनसह तीन डबे रुळावरून घसरले, तर दोन डबे उलटले. परिसरातील अनेक वाहनांचे आणि इमारतींचेही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलिस, बचाव पथके आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या असून जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. ८) ड्युटीवर जाणाऱ्या ASI ची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या पंजाबमधील अमृतसर येथे ड्युटीवर जात असताना सहाय्यक उपनिरीक्षक जोगा सिंह यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. सकाळी घरातून निघाल्यानंतर काही तरुणांनी त्यांना अडवून थेट गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत जोगा सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पंजाब पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. हत्या पूर्वनियोजित कटातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. ९) खिलाडी कुमारचा नवा धमाका! अक्षय कुमारच्या ‘समूक’मध्ये हॉलिवूडच्या दिग्गजाची एन्ट्री अक्षय कुमार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर नव्या अवतारात झळकणार आहे. ‘भूत बंगला’च्या यशानंतर आता त्याच्या आगामी स्पाय-ॲक्शन चित्रपट ‘समूक’ची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा करत असून निर्मितीत अक्षय कुमार,विपुल अमृतलाल शाह आणि आशिम शाह सहभागी आहेत. विशेष म्हणजे हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट कोऑर्डिनेटर ल्यूक टंबर या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी ‘मिशन: इम्पॉसिबल’, ‘वेनम’ आणि ‘प्रिडेटर’ सारख्या चित्रपटांवर काम केले आहे. दरम्यान, अक्षयचा बहुप्रतिक्षित वेलकम टू द जंगल चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १०) भर सामन्यात चीअरलीडर्ससोबत हुल्लडबाजांनी केले गैरवर्तन लखनौविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने ७ विकेट्सनी विजय मिळवत प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, या सामन्यादरम्यान स्टँड्समधील काही हुल्लडबाजांनी चीअरलीडर्ससोबत गैरवर्तन केल्याची लाजिरवाणी घटना घडलीय. व्हीआयपी स्टँड्समधील हा वाद वाढताच महिला पोलिसांनी तात्काळ मोर्चा सांभाळून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मैदानात मात्र कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद शतक ठोकून पंजाबच्या सलग ६ पराभवांची मालिका संपवली. १४ सामन्यांत १५ गुणांसह पंजाब चौथ्या स्थानावर असून, त्यांचे भवितव्य आता मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यावर अवलंबून आहे.