Todays TOP 10 News: दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार; विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वय ६६ यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी जात असताना बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान त्यांचे विमान कोसळले. खराब दृश्यमानतेमुळे धावपट्टीवर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना विमान घसरले आणि भीषण आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा 5 जणांचा मृत्यू झाला. अजित दादांचे पार्थिवावर उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. अजित दादांच्या विमान अपघातात चूक कोणाची? VSR एव्हिएशनच्या मालकाचा मोठा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच, अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही. के. सिंग यांनी खळबळजनक दावा केलाय. विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, असे स्पष्ट करत सिंग यांनी या भीषण दुर्घटनेचे खापर थेट वैमानिकांवर फोडलेय. व्हीएसआर एव्हिएशनचे मालक सिंग म्हणाले की, विमान सुस्थितीत होते आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा. धावपट्टी बदलण्याचा निर्णय वैमानिकांचा होता आणि रनवे न दिसल्याने ही चूक घडली, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. कॅप्टन सुमित कपूर अनुभवी असूनही ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिंग यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या अपघातातबाबत घातपातासह अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी आता डीजीसीएकडून चौकशी करण्यात येतेय. अजित दादांच्या विमान अपघातावर संशय; सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी Ajit Pawar पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली असून महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा शोक जाहीर केलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय. केंद्रीय तपास यंत्रणांवरील विश्वास उडाल्याचे सांगत त्यांनी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून नेत्यांच्या प्रवासादरम्यान होणाऱ्या अशा अपघातांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटलेय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना हा राज्याचा मोठा तोटा असल्याचे म्हटले आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिलेय. पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; अजित दादांच्या निधनावर शोक Ajit Pawar Death जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असताना झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले आणि अजितदादांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ‘अजित पवार हे तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेले कर्तव्यदक्ष जननेते होते’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शरद पवार यांनी तातडीने बारामती गाठून अपघातस्थळाची माहिती घेतली. उद्या सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून, यावेळी राज्यासह देशातील बडे नेते तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहतील. आता घरबसल्या अपडेट करा आधार; UIDAI कडून नवीन अॅप लाँच aadhaar आधार कार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. ‘यूआयडीएआय’ने आपले नवीन अधिकृत अॅप लाँच केले असून, यामुळे आता मोबाईल क्रमांक आणि पत्ता अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. तसेच हे अॅप सुरक्षित ऑफलाइन पडताळणीची सुविधा देते, ज्यामुळे हॉटेल चेक-इन किंवा सिम कार्ड खरेदी करताना आधारची फोटोकॉपी देण्याची जोखीम आता संपणार आहे. वापरकर्ते सुरक्षित क्यूआर कोडद्वारे आपली ओळख पटवू शकतात. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या अॅपमध्ये एकाच फोनवर कुटुंबातील पाच सदस्यांचे प्रोफाईल ठेवण्याची सोयही देण्यात आलीय. यामुळे आधार व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुलभ झालेय. aadhaar या नावाने हे अॅप असून लगेच डाॅऊनलोड किंवा अपडेट करा. भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटींची भर stock market भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी आपली तेजी कायम राखत बुधवारी गुंतवणूकदारांना मालामाल केले. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि भारत-युरोपियन युनियनमधील व्यापार कराराच्या वृत्ताने बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. दिवसभराच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ४८७ अंकांच्या वाढीसह ८२,३४४ वर स्थिरावला, तर निफ्टी १६७ अंकांनी वधारून २५,३४२ च्या पातळीवर बंद झाला. या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६ लाख कोटी रुपयांची मोठी वाढ झालीय. विशेषतः संरक्षण क्षेत्रातील समभागांनी ५ टक्क्यांपर्यंत उसळी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही दीड टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवत चौफेर खरेदीचा कल स्पष्ट केला. चांदी पावणेचार लाखांवर, सोनेही दीड लाखांच्या पार gold silver rates सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली अभूतपूर्व वाढ थांबण्याचे नाव घेत नसून, वायदा बाजारात चांदीची किंमत प्रति किलो ३ लाख ७९ हजार रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली. सोन्याच्या दरातही सुमारे ४ टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम १ लाख ६३ हजारांच्या वर गेले. जागतिक बाजारपेठेत डॉलरचे मूल्य चार वर्षांच्या नीचांकी स्तरावर घसरल्याने गुंतवणूकदारांचा कल मौल्यवान धातूंकडे वाढला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने ५,२०० डॉलर्स प्रति औंसचा टप्पा ओलांडलाय. डॉलरच्या घसरणीमुळे आणि अमेरिकेतील अस्थिर धोरणांमुळे चालू वर्षात सोन्यात २० टक्के, तर चांदीत तब्बल ६० टक्के वाढ नोंदवण्यात आली. अॅमेझॉनमध्ये 16 हजार कर्मचाऱ्यांची कपात; एआय तंत्रज्ञानामुळे नोकरीवर टाच amezon जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १६,००० पदे कमी करणार असून, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी कर्मचारी कपात आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. प्रामुख्याने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, रिटेल, प्राइम व्हिडिओ आणि एचआर विभागावर याचा परिणाम होईल. कोरोना महामारीच्या काळात झालेली अतिरिक्त नोकरभरती आणि आता वाढलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थात AI वापर ही या कपातीमागची मुख्य कारणे मानली जात आहेत. एआयमुळे प्रशासकीय कामे आणि कोडिंगमधील जटिल समस्या वेगाने सुटत असल्याने मानवी श्रमाची गरज कमी होतेय. कंपनी आता खर्च कमी करण्यासाठी वेअरहाऊसमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशनवर अधिक भर देतेय. विमान अपघातात अनेक ताऱ्यांचा अस्त; इंदर ठाकूर यांनी संपूर्ण कुटुंब गमावले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश हादरला असतानाच, पुन्हा एकदा विमान अपघातांच्या भीषण आठवणी ताज्या झाल्यात. मनोरंजनाच्या जगातील अनेक दिग्गज कलाकारांनी अशाच दुर्दैवी अपघातात आपले प्राण गमावलेत. ‘नदिया के पार’ फेम अभिनेते इंदर ठाकूर यांचा यात समावेश असून, १९८५ मध्ये एअर इंडियाच्या विमानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांच्यासह पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात कोणाचेही अवशेष हाती लागले नव्हते. त्याचप्रमाणे ‘पा’ चित्रपटातील बालकलाकार तरुणी सचदेव हिचा २०१२ मध्ये नेपाळमध्ये तिच्या १४ व्या वाढदिवसाच्या दिवशीच विमान अपघातात मृत्यू झाला. ‘सूर्यवंशम’ अभिनेत्री सौंदर्या हिचाही २००४ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता, त्यावेळी त्या गरोदर होत्या. तर हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आलिया हिचे विमानही उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले होते. या अपघातांनी केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर अवघ्या जगाला सुन्न केलेय. बांगलादेशचा महिला संघ टी-20 वर्ल्डकपसाठी पात्र; नेदरलँड्सचाही ऐतिहासिक प्रवेश बांगलादेशचा संघ टी-२० विश्वचषकासाठी पात्र बीसीसीआय आणि केकेआरशी झालेल्या वादामुळे बांगलादेशच्या पुरुष संघाने २०२६च्या टी-२० वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला असून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश झाला. मात्र, या वादाच्या सावटात बांगलादेशच्या महिला संघाने थायलंडचा ३९ धावांनी पराभव करून २०२६ च्या महिला टी-२० वर्ल्ड कपचे तिकीट मिळवले. यासोबतच नेदरलँड्सच्या महिला संघानेही पहिल्यांदाच या जागतिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करत इतिहास रचला. इंग्लंड आणि वेल्समध्ये १२ जूनपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत आता १२ पैकी १० संघ निश्चित झालेत. पुरुष संघाच्या बहिष्काराने नाराज असलेल्या बांगलादेशी चाहत्यांसाठी महिला संघाची ही कामगिरी मोठा दिलासा देणारी ठरली.