Todays TOP 10 News: मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय; दळणवळण आणि पायाभूत सुविधांना गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या दळणवळण आणि पायाभूत सुविधांना गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणाऱ्या ३५ किमी लांबीच्या मेट्रो ८ मार्गाला राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली. २२ हजार ८६२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, यात २० स्थानकांचा समावेश असेल. विमानतळ मेट्रोसोबतच समृद्धी महामार्गाच्या नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली या विस्तारित कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ६६ किमीच्या शहर परिक्रमा मार्गासाठी ३,९५४ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून, गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी सिमेंट काँक्रिटचा नवा महामार्ग उभारला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबवण्याचा आणि शासकीय जमिनींचा भाडेपट्टा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही प्रशासनाने घेतलाय. हप्ता रखडलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; अंगणवाडी सेविकांकडे आली यादी Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचे अनुदान जमा झालेले नाही. हेल्पलाइन आणि ऑनलाइन तक्रारी करूनही मार्ग न निघाल्याने आता शासनाने त्रुटी दुरुस्तीची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवलीय. जळगाव जिल्ह्यातच सुमारे एक लाख आठ हजार महिला या लाभापासून वंचित असून, त्यांच्या नावांच्या याद्या तालुकास्तरावरून अंगणवाडी सेविकांकडे पाठवण्यात आल्या आहेत. आधार, बँक खाते किंवा माहितीतील विसंगती दूर करण्याचे काम आता गावपातळीवर होणार आहे. प्रशासनाने संबंधित महिलांना घाबरून न जाता आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, त्रुटींची पूर्तता झाल्यावर प्रलंबित अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार maratha reservation मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून प्रलंबित असलेले ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू करण्याचे संकेत दिलेत. मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू झाले असले तरी सातारा गॅझेटियरची प्रतीक्षा होती. आचारसंहितेच्या तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय प्रलंबित होता, मात्र आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपताच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे मराठा समाजातील पात्र उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, समाजातील संभ्रम दूर करण्यास मदत होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच कायम; सुप्रीम कोर्टात आता १८ फेब्रुवारीला सुनावणी Shivsena संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. न्यायालयाने आता या प्रकरणासाठी १८ फेब्रुवारी ही नवी तारीख निश्चित केली असून, यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी फेटाळली गेली. यापूर्वी २१ जानेवारी रोजी होणारी सुनावणी अरावली पर्वताच्या प्रकरणामुळे टळली होती. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेले नाव आणि चिन्ह, तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आता एकत्रित सुनावणी होईल. वारंवार मिळणाऱ्या तारखांमुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच आता या न्यायालयीन लढाईचा पुढचा अंक पाहायला मिळेल. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण; थंडीचा कडाका ओसरलेलाच राहील राज्याच्या हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे थंडी गायब झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण निर्माण झालेय. हवामान विभागाने आज कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, यामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ झालीय. प्रामुख्याने ठाणे, रायगड, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांत ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला असून रत्नागिरीत सर्वाधिक ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत आज सकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस हे ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याने थंडीचा कडाका ओसरलेलाच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. UGCच्या नवीन नियमावलीवरून वाद; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया उच्च शिक्षण संस्थांमधील भेदभाव रोखण्यासाठी यूजीसीने लागू केलेल्या २०२६ च्या नवीन नियमावलीवरून देशभरात गदारोळ सुरू असताना, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. या नवीन नियमाचा गैरवापर कोणालाही करता येणार नाही आणि कोणावरही अन्याय किंवा भेदभाव होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या नियमांतर्गत स्थापन होणारा ‘इक्विटी सेल’ पारदर्शकपणे काम करेल आणि सर्व निर्णय संविधानाच्या कक्षेतच घेतले जातील, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले. या नव्या नियमावलीत अनुसूचित जाती-जमातीसोबतच ओबीसी, आर्थिक मागास प्रवर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनाही संरक्षणाच्या कक्षेत आणलेय. मात्र, यामुळे खुल्या वर्गावर खोट्या तक्रारी दाखल होऊन अन्याय होईल, अशी भीती व्यक्त करत काही संघटनांनी विरोधाचा पवित्रा घेतलाय. लखनऊमध्ये करणी सेनेने आंदोलनाची हाक दिली असून, भाजपमधील काही स्थानिक नेत्यांनीही या निर्णयाला विरोध करत राजीनामे दिलेत. तर दुसरीकडे, खासदार चंद्रशेखर आझाद यांनी या नियमांचे समर्थन केलेय. ‘हलवा’ वाटून अर्थसंकल्पाच्या कामाला सुरुवात; आता अधिकारी राहणार ‘कैदेत’ देशाचा नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीची महत्त्वाची ‘हलवा सेरेमनी’ आज पार पडली. भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभ कामाची सुरुवात गोड पदार्थाने केली जाते, त्याचप्रमाणे अर्थमंत्रालयात हलवा बनवून तो सर्वांना वाटण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य अर्थ असा की, आता अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू झाले असून कमालीची गोपनीयता पाळली जाणार आहे. या प्रक्रियेत सामील असलेले सुमारे ७० अधिकारी आता पुढील काही दिवस अर्थमंत्रालयातच राहतील. त्यांना फोन, इंटरनेट किंवा कुटुंबाशी संपर्क साधण्याची परवानगी नसते, जेणेकरून बजेटमधील माहिती लीक होऊ नये. यंदा मंत्रालयाचे ऑफिस बदलले असले तरी, छपाई मात्र जुन्याच ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये होणार आहे. थोडक्यात, ही एक गोड परंपरा असून त्यासोबतच देशाच्या तिजोरीचा हिशोब आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यार आहेत. भारतीय वस्तूंना 27 देशांत ‘ड्युटी-फ्री’ एन्ट्री; भारत-ईयू मुक्त व्यापार करार संपन्न India-EU FTA भारत आणि युरोपीय संघाने (EU) मंगळवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी केली असून, यामुळे दोन अब्ज लोकांची एक मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. या ‘मदर ऑफ ऑल डील्स’ अंतर्गत, युरोपीय देश भारताच्या ९९.५% वस्तूंवरील आयात शुल्क पूर्णपणे हटवणार आहेत. यामुळे कापड, रसायने आणि फुटवेअर यांसारख्या भारतीय वस्तूंना २७ देशांत करमुक्त प्रवेश मिळेल. बदल्यात, भारतही युरोपीय वाइन आणि महागड्या गाड्यांवरील शुल्कात सवलत देणार आहे. मात्र, भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि धान्याला यातून वगळण्यात आलेय. उभय देशांतील द्विपक्षीय व्यापार लवकरच २०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची शक्यता या करारामुळे निर्माण झालीय. विजय सेतुपती आणि अरविंद स्वामींचा ‘गांधी टॉक्स’; संवादांविना काळजाचा ठोका चुकवणारा ट्रेलर प्रदर्शित दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय. दिग्दर्शक किशोर बेलेकर यांच्या ‘गांधी टॉक्स’ या मूक चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून, संवादांशिवाय केवळ भावना आणि अभिनयाचा जबरदस्त आविष्कार यात पाहायला मिळतोय. या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत अरविंद स्वामी आणि अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये विजय सेतुपती एका सामान्य तरुणाच्या भूमिकेत दिसत असून, दुसरीकडे अरविंद स्वामी एका श्रीमंत व्यावसायिकाच्या रुपात समोर आलेत. गरीबी, श्रीमंती आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष या ट्रेलरमधून प्रभावीपणे मांडण्यात आलाय. अदिती राव हैदरी आणि विजय सेतुपती यांच्यातील मूक प्रेमकहाणी देखील लक्षवेधी ठरतेय. शब्दांशिवाय मांडलेली ही गुंतवून ठेवणारी कथा येत्या ३० जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हार्दिक पंड्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 10 वर्षे पूर्ण; ‘ही तर फक्त सुरुवात’ म्हणत व्यक्त केल्या भावना Hardik Pandya भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० यशस्वी वर्षे पूर्ण केली. जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामन्यातून पदार्पण करणाऱ्या हार्दिकने या प्रवासाबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने आपल्या संघर्षाचा उल्लेख करत, हे यश केवळ सुरुवात असल्याचे म्हटले असून भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. गेल्या दशकात हार्दिकने अनेक चढ-उतार पाहिले, मात्र २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. बडोद्याच्या मैदानापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आज जागतिक क्रिकेटमधील एक प्रभावी अष्टपैलू म्हणून स्थिरावला. चाहत्यांचे आभार मानताना त्याने हा काळ आपल्याला खूप काही शिकवून गेल्याचे नमूद केले. हेही वाचा – India-EU FTA: भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार संपन्न; 93% भारतीय उत्पादनांना 27 देशांत ‘ड्युटी-फ्री’ प्रवेश