आजची शिक्षककेंद्री पद्धत बदलावी लागेल – डॉ. भूषण पटवर्धन

पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्राध्यापकांना मार्गदर्शन

पुणे – “नवीन शैक्षणिक धोरणानुसार आजची शिक्षककेंद्री पद्धत आपल्याला बदलावी लागेल, शिक्षकांना बदलावं लागेल’, असं प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षातर्फे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. या वेबिनारमध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर , प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव व अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे, इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित होते.

पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डॉ. पटवर्धन पुढे म्हणाले, समाज हा सुद्धा प्रभावी शिक्षक असतो. त्यामुळे आपल्याला माहिती, ज्ञान, तंत्रज्ञान आणि कसब देणारे आचार्य, पंडित व्हायला हवे. विद्यार्थ्याला दृष्टी देणारा, त्याला आपल्यासोबत घेऊन जाणारा गुरु बनायचं आहे. त्यामुळेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार आजची शिक्षककेंद्री पद्धत बदलताना शिक्षकांना त्यांची मानसिकता बदलून जास्तीत जास्त सकारात्मक विचारसरणीवर भर द्यायला हवा. या नवीन शैक्षणिक धोरणाने शिक्षकांच्या पुनर्रचनेवर भर दिला आहे.
आंतर विद्याशाखीय शिक्षणाची संकल्पना भारतात सर्वप्रथम पुणे विद्यापीठात राबविण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात या संकल्पनेवर भर देण्यात आलेला आहे.भविष्यातील विद्यापीठ कसं असावं याबाबत एक आराखडा तयार करण्याचे आवाहन पटवर्धन यांनी या वेबिनारच्या माध्यमातून प्राचार्य व प्राध्यापकांना केले.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची नेमकी दिशा काय असेल याचे विवेचन डॉ. भूषण पटवर्धन यांनी या वेबिनारमध्ये केले. यानंतर डॉ. भूषण पटवर्धन यांनी प्राध्यापक, प्राचार्य यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

या वेबिनारमध्ये प्रास्ताविक करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांनीही अभ्यासक्रमांध्ये मूलभूत बदल करणे आवश्यक असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे शक्य होणार असल्याचे म्हटले.

वेबिनारमध्ये सूत्रसंचलन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले तर प्र- कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी यांनी आभार मानले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या ४०० प्राचार्य, प्राध्यापक यांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.