“ब्रेक्‍झिट’चे पर्याय निवडण्यासाठी ब्रिटीश खासदारांचे आज मतदान 

लंडन  – “ब्रेक्‍झिट’साठी कोणता पर्याय निवडायचा यासाठी ब्रिटनच्या संसदेतील खासदार आज मतदानकरणार आहेत. यापूर्वी संसदेने नामंजूर केलेल्या पर्यायाला पाठिंबा देण्याचे आवाहन पंतप्रधान थेरेसा मे यांनी खासदारांना केले. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली. युरोपिय संघामधून ब्रिटनने बाहेर पडण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वीच्या सार्वमतातूनच झाला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कधी आणि कशी करायची, याबाबत अजूनही अनिश्‍चितता कायम आहे.

युरोपिय संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून थेरेसा यांनी मांडलेला प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा संसदेमध्ये उत्स्फूर्तपणे फेटाळला गेला आहे. आता जर आठवड्याभरामध्ये ब्रिटनच्या संसदेने ठराव मान्य केला तर ब्रिटन 22 मे रोजी युरोपिय संघातून बाहेर पडू शकेल. अन्यथा “कोणत्याही ठरावाशिवाय’ 12 एप्रिलला ब्रिटनला युरोपिय संघातून बाहेर पडावे लागेल, असे युरोपिय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एकूण चार पर्याय उपलब्ध

खासदारांसमोरील पर्यायांमध्ये युरोपिय संघाबरोबर कस्टम्स युनियन, एकाच बाजारपेठेमध्ये कायम रहाणे, दुसऱ्यांदा सार्वमत घेणे किंवा कलम 50 रद्द करून “ब्रेक्‍झिट’थांबवणे असे चार पर्याय खासदारांसमोर आहेत. याशिवाय अन्य पर्यायांचा विचार सभापती जॉन बेर्को यांच्या संमतीने स्वीकारला जाईल. त्यावरील मतदानानंतरच “ब्रेक्‍झिट’चे भविष्य ठरणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.