पुणेकरांनो, आज लोकशाहीचा महाकुंभ

निर्भयपणे मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन


मतदान केंद्रही सज्ज : संवेदनशील ठिकाणांचे लाइव्ह प्रक्षेपण

पुणे – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे व बारामती मतदारसंघात मंगळवारी (दि.23) मतदान होत आहे. यासाठी दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सोमवारी दुपारपासून अधिकारी पोहचण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सायंकाळपर्यंत अधिकारी व कर्मचारी पोहचले. यानंतर अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज केली असून मतदारांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

पुणे व बारामती मतदारसंघात एकूण 12 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीचे साहित्य नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आदींचा समावेश होता. यानंतर मतदान केंद्रनिहाय कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले. या पथकामध्ये पोलिसांचीही समावेश आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना एकत्रित जाण्याचा तसेच एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आले. मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचल्यानंतर त्याची माहिती त्यांनी झोनल अधिकारी यांना कळविली.

बिघाड झाल्यास 20 ते 35 मिनिटांत नवे मशीन
प्रत्येक 10 ते 12 मतदान केंद्राच्या मागे एका झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी मतदान केंद्रांची पाहणी करणार आहे. मतदान केंद्रावर काही समस्या निर्माण झाल्या तर झोनल अधिकारी याबाबत निर्णय घेणार आहे. या अधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त कर्मचारी आणि राखीव मतदान यंत्रे असणार आहे. जर शहरी भागता एखाद्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास 20 मिनिटात त्या मतदान केंद्रावर नविन मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर ग्रामीण भागात सुमारे 30 ते 35 मिनिटात संबधित केंद्रांवर नवीन मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही
पुणे लोकसभा मतदारसंघात 91 तर बारामती मतदारसंघात 62 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्याचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या कक्षात पाहता येणार आहे. यावर जिल्हाधिकारी हे नियंत्रण ठेवणार आहे. तसेच या संवेदनशील मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले असून ते निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे.

बोगस मतदानाला आळा घालणार
मतदान केंद्रावर बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. दुबार, मयत आणि स्थलांतरीत अशा मतदारांची वेगळी यादी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. या यादीतील मतदारांकडे दोन ओळखपत्राची मागणी केली जाणार आहे.

येथे शोधा नाव
या www.electroalsearch.in , www.ceo.maharashtra.gov.in , www.nvsp.in संकेतस्थळावर मतदार यादीतील नाव, मतदान केंद्रे शोधता येणार आहे. व्होटर हेल्पलाइन या ऍपवर ही माहिती मिळणार आहे.

निवडणूक विषय तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीची सदर नियंत्रण कक्षामध्ये नोंद घेण्यात येणार असून विविध पथकामार्फत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

मतदारांसाठी हेल्पलाइन
020-26121231/71/81/91

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.