नवी दिल्ली – जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे त्याचबरोबर रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले. सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 141 रुपयांनी कमी होऊन 48,509 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. मात्र चांदीचे दर 43 रुपयांनी वाढून 66,019 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल सोने आणि चांदीच्या दराबाबत बोलताना म्हणाले की, जागतिक आर्थिक परिस्थिती आणखी पूर्ववत झाली नसल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा काही प्रमाणात कल राहील.
मात्र दरम्यानच्या काळात खरेदी-विक्रीच्या लाटा येत राहतील. त्यातच रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाल्यामुळे आयात महाग होऊन सोन्याचे दर वाढले. सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारासाठी ही खरेदी फायदेशीर ठरू शकते असे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले आहे.