-->

विशेष : रयतेचा राजा

-प्रा. भा. ब. पोखरकर

फाल्गुन वद्य तृतियेला (19 फेब्रुवारी 1630) शिवनेरी किल्ल्यावर शिवबांचा जन्म झाला. लहानपणी शिवनेरी किल्ल्यावर मातीचे गडकोट निर्माण करून, हे गड माझे म्हणणाऱ्या राजांनी मोठेपणी गडकिल्ले जिंकून आणि दूर्ग बांधून स्वराज्य निर्माण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी वाहिले. जुलमी सत्तेविरुद्ध आवाज उठविला. गनिमी काव्याने शत्रूला सळो की पळो करून सोडले. शक्‍तीपेक्षा युक्‍ती श्रेष्ठ याची साक्ष पटवून दिली. युद्धामध्ये शक्‍तीपेक्षा युक्‍तीचा वापर करून अनेकवेळा शत्रूला पराभूत केले. याच तंत्राचा वापर करून प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत महाराजांनी अफजल खानाचा वध केला. आपल्या स्वराज्यात कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करून जनतेचा विश्‍वास संपादन केला. इतर सत्ताधिशांवर वचक बसवला.

निर्भयता, साहस, शौर्य, धैर्य, औदार्य, विवेक असे अनेक गुण त्यांच्या अंगी होते. त्यांच्यातील सर्वोत्तम गुण म्हणजे निष्कलंक चारित्र्य. जिभेला झालेली जखम बरी होते, पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. आपल्या बोलण्याने माणसे जोडली गेली पाहिजेत, अशी शिकवण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यांच्यामध्ये संकटाशी लढण्याची विलक्षण ताकद होती. नशीब नेहमी धाडसाला साथ देते अशी त्यांची धारणा होती. गुन्हेगाराला ताबडतोब शासन हा त्यांच्या आयुष्याचा मंत्र होता. शिवाजी महाराजांच्या गुणांचे वर्णन एका पोर्तुगीज इतिहासकाराने पुढीलप्रमाणे केले आहे- “गुढ आणि अद्‌भुत, साहसप्रेमी आणि धाडसी, नशीबवान, आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर, मनमिळावू, सौजन्यशील स्वभाव, शरणागतास औदार्याने वागवणारा, उत्स्फूर्त आणि तरल बुद्धिमत्तेचा, झटपट निर्णय घेणारा, शिस्तप्रिय, निष्णात डावपेची, दूरदृष्टीचा प्रतिभावान राजपटू, कुशल संघटक असे व्यक्‍तिमत्त्व. तर दिल्लीचे मोगल, विजापूरकर, तुर्क, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या प्रतिस्पर्ध्यांशी चतुराईने राजकारण करणारा राजा.’

शिवाजी महाराजांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे सावधानता. 1659 साली अफजल खानाचा वध करताना, 1660 साली शाहिस्तेखानाची बोटे तोडताना, दिल्लीतून बादशहा औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करताना महाराजांनी दाखविलेले धाडस आणि चतुराई अजोड होती. शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धेच्या चालीरिती बंद केल्या. धर्म आणि नीतीने राज्य केले. शिवाजी महाराजांवर संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांचे शिष्यत्व स्वीकारण्यासाठी देहू गावी गेले असताना, तुकाराम महाराज शिवाजी राजांना म्हणाले, “तुम्ही स्वराज्याचे सारथ्य करावे हाच तुमचा धर्म आहे आणि कीर्तन करून समाजाला जागते ठेवणे हा आमचा धर्म आहे.’

स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांचे त्यांनी संरक्षण केले. शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर आपल्या सरहद्दीचे रक्षण केले. देवळे आणि स्वधर्माचे रक्षण केले. शिवाजी महाराज हे एक कष्टाळू आणि पराक्रमी राजे होते. आदिलशाही सैन्याशी त्यांच्या अनेक लढाया झाल्या. त्या लढाया त्यांनी जिंकल्या. जेव्हा मुघलांचे एक बलाढ्य सैन्य शिवाजी महाराजांवर चालून आले. तेव्हा त्यांनी डोंगराळ प्रदेशाचा आसरा घेऊन मुघलांशी युद्ध सुरू ठेवले. मुघलांना आपल्या सैन्याला रसद पोहोचवणे अशक्‍य झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. महाराजांच्या सैन्याने एका अरुंद खिंडीत गाठून त्यांची धुळधाण उडवून दिली. शिवाजी महाराजांचे हेरखातेही प्रभावी होते.

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य रयतेसाठी होते. रयतेच्या हितासाठी त्यांनी राज्यकारभार केला. उभे आयुष्य रणधुमाळीत जात असताना त्यांनी रयतेकडे दुर्लक्ष केले नाही. स्त्रियांना मानाचे स्थान दिले. भरकटलेल्या समाजाला नवी दृष्टी, नवी दिशा दिली. त्यांची युद्धनीती असामान्य होती. शत्रूची कमजोरी हेरून त्याला खिंडीत गाठून पराभूत करण्याचे तंत्र त्यांना अवगत होते. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राज्याची धुरा सांभाळली. अचानक आलेल्या अस्मानी संकटाशी दोन हात कसे करायचे याचा गुरूमंत्र त्यांनी आपल्या मावळ्यांना दिला. त्यांच्याकडे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक होती. परिस्थिती काहीही असो तिच्यावर मात करता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले. जिजाऊंचे संस्कार आणि विचारांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली. स्वराज्याच्या स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे करून निधड्या छातीची ढाल करून लढत राहणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये होते. शिवाजी महाराज रयतेचे तारणहार, पालनकर्ते होते. ते उत्तम राजकारणीही होते.

जेष्ठ शुद्ध 12, शुक्रवार (6 जून 1674) या दिवशी रायगडावर शिवाजीराजे छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी जनतेतील स्वाभिमान जागृत केला. 30 वर्षे झुंज देऊन बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी यासारख्या रणवीरांच्या हौतात्म्याने स्वराज्य उभे राहिले. राज्याभिषेकाच्या दिवशी ज्ञात-अज्ञात शेकडो वीरांना श्रद्धांजली वाहिली गेली. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे धडे जगातील अनेक देशांनी घेतले. जगातील उत्तम सेनापतींमध्ये महाराजांचा उल्लेख केला जातो. जगातील अनेक विद्यापीठांमध्ये महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जात आहे. आज शिवाजी महाराजांचे कोठेही मंदिर नाही पण कोट्यवधी लोकांच्या हृदयमंदिरात ते विराजमान आहेत. छत्रपती हा माणूस नाही, तो विचार आहे. छत्रपती हा एक संस्कार आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.