आज ठरणार खासदार

नगरमध्ये विखे की जगताप अन्‌ शिर्डीत लोखंडे की कांबळे

नगर –
तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील नगर दक्षिण व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवारी होणार आहे. निवडणूक निकालाची घटिका आता समिप आल्याने उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात शिर्डीपेक्षा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी व भाजपमध्ये प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ केल्याने कोण बाजी मारणार याबाबत कमालीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे की राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तर शिर्डीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे की कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यापैकी कोण होणार खासदार हे आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत युती हॅटिट्रक साधणार का हा उत्सुकतेचा विषय झाला आहे.

लोकसभा निवडणूक नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणारी ठरली आहे. भाजपपेक्षा राष्ट्रवादीने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. आघाडी होवून देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला नाही. केवळ विखेंना विरोध म्हणून पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच ही जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपची उमेदवारी मिळविली. त्यामुळे विद्यमान भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना डावलण्यात आले.

राष्ट्रवादीने उमेदवार निश्‍चित करतांना अनेकची नावे चर्चेत आणली. अखेर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशी झाली. गेल्या तीन वर्षांपासून विखे या मतदारसंघात नियोजन करीत होते. त्यामानाने अवघ्या 23 दिवसांत आ. जगताप यांनी मतदारसंघ पिंजून काढून विखेंसमोर आव्हान उभे केले. अर्थात याला शरद पवार यांचे फिल्डिंग देखील महत्वाची ठरली. पक्षातील नाराज एकात्र आणून जगतापांच्या मागे एकत्रित मोट बांधली. विखे नगर दक्षिणेत आल्यानंतर सर्व स्तरावर हस्तक्षेप करतील.

ही भिती शिवसेना – भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना होती. तशी तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रत्येकाने आपली राजकीय सोय लक्षात घेवून निवडणुकीत मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला. भाजप-शिवसेना युतीचे चार आमदारांवर विखेंची भिस्त होती तशी आ.जगताप यांची स्वतःएक आमदारवर भिस्त होती. आगामी विधानसभा निवडणूक पाहता युतीच्या आमदारांना प्रमाणिकपणे काम करणे आवश्‍यक होते. त्यानुसार त्यांनी खरेच काम केले नाही हे उद्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात विखे व पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. विखेंनी कॉंग्रेस सोडली नसली तरी ते या मतदारसंघात डॉ. सुजय चा प्रचार करणार नव्हते. परंतु पवारांनी ही निवडणूक हाती घेतल्याने विखेंचा नाईलास झाला.

अखेर ते राजरोजपणे भाजपच्या कळपा घुसले व डॉ. विखेंचा प्रचार सुरू केला. शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांनी मात्र या निवडणुकीत विखेंचा जोरादार प्रचार केला. दि. 23 एप्रिल रोजी नगर दक्षिणेसाठी मतदान झाले. त्यानंतर तब्बल एक महिन्यांनी उद्या मतमोजणी होत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ सुरवातीला दुर्लक्षित राहिला. विखेंच्या भूमिकवर या मतदारसंघाचे भवितव्य ठरविण्यात येत होते. परंतू विखेंनी नगर दक्षिणची निवडणूक झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सर्व भिस्त होती.

शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे गेल्या निवडणुकीत अवघ्या 17 दिवसात खासदार झाले. परंतू त्यांनी मतदारसंघात संपर्क न ठेवल्याने व विकास कामांपासून दूर राहिल्याने मतदारसंघात त्यांच्या विरोधात मोठी नाराजी होती. त्या तुलनेत कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याबद्दल सहानुभूतीसह विकास कामे करणार नेते म्हणून ओळख झाली होती. या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस असतांना अपक्ष माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व वंचित आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांनी दोन्ही उमेदवारांचा तसा विचका केला आहे.

वाकचौरे व सुखदान यांच्यामुळे मत विभागणी झाल्याने त्याचा कोणाला फायदा होणार असा प्रश्‍न आहे. आ. थोरात यांनी नगर दक्षिणसह शिर्डी मतदारसंघ पिंजून काढून विखेंना सळो की पळो केले. तसा विखेंनी देखील दोन्ही मतदारसंघात आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.नगर दक्षिणेत शरद पवारांनी स्वतः जातीने लक्ष घातले होते. पवारांनी पाच दौरे या मतदारसंघ झाले तर मुख्यमंत्र्यांचे चार दौरे झाले. मुख्यमंत्री व पवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय घडमोडींकडे लक्ष देवून वेळोवेळी दुरुस्ती केली. आता निकालाची उत्सुकता आहे. नगर दक्षिण व शिर्डीचा खासदार कोण होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×