आज ठरणार महापौर, उपमहापौर

कोअर कमिटीची नावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे


अनुभवींना संधी, की नवीन चेहरा ठरणार वरचढ

पुणे – महापालिकेत विक्रमी बहुमत असलेल्या भाजपचा दुसरा महापौर कोण असेल, हे आज निश्‍चित होणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, भाजपचे एकहाती बहुमत असल्याने जो उमेदवार अर्ज भरेल, तोच महापौर आणि उपमहापौर असणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार आहे.

महापौर निवडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीच्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत 3 नावांवर एकमत न झाल्याने कोअर कमिटीने बंद लिलाफ्यात आपली नावे शहराध्यक्षांकडे सादर केली आहेत. ही नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार, या दोन्ही पदांसाठीची नावे सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पक्षाकडून निश्‍चित केली जातील, असे सांगण्यात येत आहे.

162 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत भाजपचे तब्बल 99 नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीनंतर भाजपने मुक्ता टिळक यांना महापौरपद दिले होते. त्यासाठी त्यांना अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत असल्याने शासनाने या पदास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ही मुदत 22 नोव्हेंबर 2019 ला संपत आहे. दरम्यान, या पदासाठी मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या लॉटरीत हे पद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपचा कोणीही नगरसेवक महापौर होऊ शकणार आहे. त्यामुळे या पदासाठी पक्षात मोठी रस्सीखेच आहे. तर भाजपचे अनुभवी सदस्य असलेले मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने, धीरज घाटे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, राजेंद्र शिळीमकर यांचीही नावे आघाडीवर असल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले सदस्यही अनुभवी असून उपनगरांमधील नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे काही तासांत निश्‍चित होणार आहे.

कोअर कमिटीत एकमत नाहीच
महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार निश्‍चित करताना पुणे भाजप कोअर कमिटीने चार नावे निश्‍चित करून कळवण्याच्या सूचना प्रदेश भाजपने दिल्या होत्या. त्यावर चर्चा करण्यासाठी महापौर बंगल्यावर शनिवारी रात्री उशिरापर्यंत या समितीची बैठक झाली. त्यात पक्षाचे दोन्ही खासदार, शहराध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, महापालिकेतील पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित आणि माजी आमदार उपस्थित होते. त्यांच्यात चार नावांवर एकमत न झाल्याने त्यांना या दोन्ही पदांसाठी एक-एक नाव चिठ्ठीत देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार या चिठ्ठ्या शहराध्यक्षांकडे देण्यात आल्या असून त्यांच्याकडून ही नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी कळवण्यात आली आहेत.

नगरसेवकांना “व्हीप’
भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना “व्हीप’ अर्थात पक्षादेश दिला असून “सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना विचारल्याशिवाय कोणत्याही नगरसेवकाने महपौरपदाचा अर्ज भरणाऱ्या नगरासेवकाच्या अर्जावर सूचक अथवा अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करू नये, तसेच सभागृहनेत्यांना कल्पना दिल्याशिवाय शहराबाहेर जाऊ नये,’ असे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.