Today TOP 10 News: अजित पवार उपमुख्यमंत्री पद सोडणार? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ Ajiit Pawar महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता सोडून महाविकास आघाडीत परततील, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची मने आता जुळली असून, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसून आलेली ही जवळीक भविष्यात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. मात्र, या दाव्यावर अजित पवार गटाने तीव्र प्रतिक्रिया दिलीय. प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी राऊतांवर टीका करताना म्हटले की, संजय राऊतांना अफवा पसरवण्याचे व्यसन लागले असून त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेय. सिंधुदुर्गात भाजपचा ‘बिनविरोध’ धमाका; जिल्हा परिषदेच्या दोन जागांवर विजयाचा गुलाल BJP महापालिका निवडणुकीतील यशाची परंपरा कायम राखत भारतीय जनता पक्षाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानापूर्वीच विजयाचे खाते उघडलेय. खारेपाटण आणि बांदा या दोन गटांत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खारेपाटण गटातून शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी माघार घेतल्याने भाजपच्या प्राची इस्वलकर यांचा विजय सुकर झाला. दुसरीकडे, बांदा गटात अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड झालीय. विरोधी पक्षांनी भाजपच्या या ‘बिनविरोध पॅटर्न’वर लोकशाही संपवत असल्याची टीका केली असली, तरी प्रत्यक्षात ५ फेब्रुवारीच्या मतदानाआधीच भाजपने दोन जागा खिशात टाकत मोठी आघाडी घेतलीय. 400 कोटींच्या कंटेनर चोरीचे नाशिक कनेक्शन; दोन हजारच्या जुन्या नोटांच्या लुटीने खळबळ कर्नाटकातील चोरला घाटात ४०० कोटी रुपये असलेले दोन कंटेनर लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचलेत. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणाच्या तपासातून हा मोठा खुलासा झालाय. गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या या कंटेनरमध्ये दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. या लुटीचा मुख्य मालक ठाण्यातील एक बडा बिल्डर असल्याचा संशय असून, राजकीय आणि बिल्डर लॉबीच्या सहभागाचे आरोप होत आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी डोंबिवलीतून एकाला ताब्यात घेतले असून आतापर्यंत ७ संशयित जाळ्यात अडकले आहेत. या ४०० कोटींच्या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिलीय. दिल्लीत AI स्मार्ट चष्म्यांद्वारे हायटेक सुरक्षा; 30 हजार सुरक्षा जवान तैनात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली अभेद्य छावणीत रूपांतरित झाली असून, तब्बल ३० हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेत. यंदाच्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच सुरक्षा दलांकडे कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित स्मार्ट चष्मे देण्यात आलेत. या चष्म्यांमुळे गर्दीतील गुन्हेगार आणि संशयितांची ओळख पटवणे सुलभ होणार आहे. हे उपकरण थेट पोलीस डेटाबेसशी जोडलेले असून, संशयिताचा चेहरा दिसताच जवानांना त्वरित धोक्याची सूचना मिळेल. सुरक्षा व्यवस्थेसाठी ७० हून अधिक निमलष्करी तुकड्या आणि १० हजार विशेष जवान केवळ नवी दिल्ली परिसरात लक्ष ठेवून आहेत. कर्तव्य पथावर सहा स्तरीय तपासणी आणि ५०० उच्च क्षमतेचे एआय कॅमेरे बसवण्यात आलेत. बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सीसीटीव्ही आणि फिरत्या एफआरएस वाहनांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला जातोय. रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला; 370 ड्रोन आणि 21 क्षेपणास्त्रे डागली रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अबू धाबी येथे त्रिपक्षीय शांतता चर्चा सुरू असतानाच, रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केलाय. रशियाने रात्रभरात ३७० हून अधिक ड्रोन आणि २१ क्षेपणास्त्रे डागल्याने युक्रेनमधील जनजीवन विस्कळीत झाले असून कीव आणि खारकीवमधील हजारो कुटुंबे अंधारात बुडाली आहेत. या भीषण हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालेय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की आणि परराष्ट्र मंत्र्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध करत, रशियाने मुद्दाम शांतता प्रक्रियेला सुरुंग लावल्याचा आरोप केलाय. अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या चर्चेदरम्यान झालेल्या या आक्रमणामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती पुन्हा एकदा गडद झाली असून, जागतिक राजकारणात तणाव वाढलाय. तरुणाई अन् मध्यमवर्गीय कर्जाच्या विळख्यात; जीवनशैलीसाठी ‘इम्पल्स बोरोइंग’चे प्रमाण वाढले loan झटपट कर्ज मिळण्याच्या सुविधेमुळे सध्याची ‘जेन-झेड’ पिढी आणि मध्यमवर्गीय कुटुंबं कर्जाच्या जाळ्यात अडकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेय. कोणत्याही नियोजनाशिवाय केवळ तात्पुरत्या गरजा किंवा मानसिक सुखासाठी कर्ज घेण्याच्या ‘इम्पल्स बोरोइंग’ वृत्तीत वाढ झाली असून, तब्बल ३६ टक्के कर्जदार केवळ आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि छंद जोपासण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत आहेत. ७ ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेला मध्यमवर्ग यामध्ये आघाडीवर असून गृहसजावट, लग्नसोहळे आणि प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले जातेय. विशेष म्हणजे, वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे ११ टक्के लोकांना उपचारांसाठी कर्ज काढावे लागतेय. क्रेडिट स्कोरची माहिती असली तरी, त्यातील तांत्रिक समज कमी असल्याने अनेकजण परतफेडीच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊन आर्थिक तणावात अडकत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होतेय. अदानी समूहाची न्यायालयात धाव; लाचखोरी प्रकरणात निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती Gautam Adani अमेरिकन बाजार नियामक ‘एसईसी’ने दाखल केलेल्या लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांनंतर, अदानी समूहाने अमेरिकन न्यायालयात आपली पहिली औपचारिक कायदेशीर भूमिका मांडलीय. गौतम अदानी यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, २१ जानेवारी रोजी ‘एसईसी’ने केलेल्या अर्जावर कोणताही तातडीचा निर्णय न घेता तो तूर्तास पुढे ढकलावा, अशी विनंती करण्यात आलीय. अदानी समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक विधी संस्थेने न्यायालयाला कळवले की, सध्या दोन्ही पक्ष एका कायदेशीर करारावर चर्चा करत आहेत, ज्याचा उद्देश न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करणे आहे. या घडामोडींमुळे अदानी समूहाला आपली बाजू मांडण्यासाठी अधिक वेळ मिळण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजार आणि समूहाच्या जागतिक प्रकल्पांवर होऊ शकतो. दरम्यान, काल शुक्रवारी अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. Jio-Airtelला टक्कर देण्यासाठी BSNL सज्ज; 22 हजार नवे टॉवर्स उभारणार bsnl खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी सरकारी मालकीची बीएसएनएल आता कंबर कसतेय. देशभरात ४जी नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी कंपनी आणखी २२ हजार नवीन टॉवर्स उभारणार असून, यासाठी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी निधीबाबत चर्चा केलीय. बीएसएनएलने यापूर्वीच एक लाख ४जी साईट्स कार्यान्वित केल्या असून, ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीवर विशेष भर दिला जातोय. विशेष म्हणजे हे संपूर्ण नेटवर्क टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या मदतीने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात ५जी मध्ये सहज अपग्रेड करता येणार असल्याने बीएसएनएल लवकरच स्पर्धेत आघाडी घेण्याची शक्यता आहे. युजवेंद्र चहल आणि आरजे महवशमध्ये दुरावा? सोशल मीडियावर एकमेकांना केले अनफॉलो भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्यातील कथित नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीय. धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यापासून चहल आणि महवश यांच्या मैत्रीच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र आता या दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. या घडामोडीनंतर आरजे महवशने शेअर केलेल्या एका गुढ पोस्टने या वादात अधिकच भर घातली. तिने आपल्या पोस्टमध्ये ‘आयुष्य सावरण्याबद्दल’ सूचक विधान केल्याने त्यांच्या नात्यात फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी अनेकदा एकत्र दिसलेले हे दोघेही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगत आले आहेत, मात्र अचानक आलेल्या या दुराव्यामुळे त्यांच्यातील मैत्री संपुष्टात आल्याच्या चर्चांना आता वेग आलाय. बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर; आयसीसीचा मोठा निर्णय, स्कॉटलंडची एन्ट्री टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केलाय. सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने आपल्या टीमला भारतात पाठवण्यास नकार दिला होता व सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावल्याने दोन्ही पक्षांत तडजोड होऊ शकली नाही. आता स्कॉटलंड ‘गट-क’ मध्ये खेळणार असून त्यांचे पहिले तीन सामने कोलकात्यात आणि शेवटचा सामना मुंबईत होणार आहेत. आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी बांगलादेशच्या आडमुठ्या धोरणामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. हेही वाचा – Nashik Crime News : राज्यात खळबळ..! 400 कोटींची रोकड असलेला कंटेनर चोरीला? घनदाट जंगलात घडलं तरी काय?