‘पंतप्रधानांना ‘चायवाला’ म्हणून चेष्टा करणारे आज ‘चहापत्ती’ खुडत आहेत; भाजपचा प्रियांका गांधींना टोला

नवी दिल्ली : आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्यामुळे इथे सर्वच पक्ष एकमेकांना सरस असण्याचा दावा करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या काही दिवसांपूर्वी आसाममध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी चहाची पानं खुडत मजुरांशी गप्पाही मारल्या. यावरूनच भाजपने आता काँग्रेस आणि प्रियंका गांधीयांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसामच्या लुमडिंगमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणून अनेकदा त्यांची चेष्टा करण्यात आली आहे. त्यावरूनच राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “आधी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यांनी “चायवाला” असे म्हणत खिल्ली उडवली जात होती, तीच लोकं आज चहापत्ती खुडत आहेत आणि विकत आहेत. खऱ्या चायवाल्याने त्यांना चहाच्या मळ्यांपर्यंत आणून सोडले आहे. पण खबरदार, खरा आणि प्रामाणिक चायवाला आमच्यासोबत आहे” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

प्रियंका यांनी आसाममधील सदरू टी एस्टेटमध्ये महिला मजुरांशी संवाद साधला होता. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंदर्भातील काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर ते जोरदार व्हायरल झाले होते. यावरून आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल या तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल जाहीर केले जातील. सध्या आसाममध्ये एनडीएचं सरकार असून सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत.

राहुल गांधी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. “नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला सणसणीत टोला लगावला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.