आज पाकिस्तानच्या बाजुने कोणीही बोलेना !

पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याची खंत

वॉशिंग्टन – भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा भंग करून आमच्या देशात कारवाई केली. त्यावरून दोन्ही देशांमध्ये सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे पण या पार्श्‍वभूमीवर जगातील एकही देश आमच्या बाजूने बोलेनासा झाला आहे. आम्हाला चीनकडून पाठिंब्याची अपेक्षा होती पण त्यांनीही आमच्याकडे पाठ फिरवली आहे अशी खंत पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी व्यक्त केली आहे.

आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्‍त केली. पाकिस्तान ही दहशतवाद्यांना आश्रय देणारी भूमी आहे असा आंतरराष्ट्रीय समुदायाचा समज झाला असून त्यामुळे त्यांची आमच्या विषयीची सहानुभुती आता संपत चालली आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. त्यांनी नमूद केले आहे की आम्हाला निदान चीनकडून पाठिंब्याची अपेक्षा होती पण त्यांनीही दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला देऊन आमच्याकडे पाठ फिरवलेली दिसते आहे.

भारताने आमच्या हवाई हद्दीचा भंग केल्याने चीनकडून भारताचा निषेध होईल अशी आम्हाला अपेक्षा होती असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की पाकिस्तानने दहशतवादी पोसले आहेत हा समज पाकिस्तानला जड जाणार आहे. त्यामुळेच जगाची पाकिस्तान विषयीची सहानुभुतीची भावना कमी होत चालली आहे. सध्या पाकिस्तानात प्रखर देशभक्तीचा ज्वर पसरला आहे त्यामुळे ही बाब त्यांच्या ध्यानात येणार नाही पण ही वस्तुस्थिती देशासाठी खरच घातक आहे असे मतही त्यांनी व्यक्‍त केले आहे.

हुसेन हक्‍कानी यांचे पाकिस्तानी लष्कराशी चांगले संबंध नाहीत आणि त्यांनी नेहमीच पाकिस्तान सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनतेचाही त्यांनी रोष ओढावून घेतला असून तेथील कट्टरपंथीयांनीही त्यांना ठार मारण्याच्या धमक्‍याही दिल्या आहेत. सध्या हक्कानी हे अमेरिकेतच वास्तव्याला आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here