‘ध्यासाचा वसा’ सोबत असणे हे आमचे अहोभाग्य

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 99 व्या वर्षात पदार्पण


 शिवयोगींच्या आठवणींना स्नुषा डॉ. चित्रलेखा यांनी दिला उजाळा

पुणे – ‘महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या आठव्या वर्षी सुरू केलेला इतिहासाचा अभ्यास 99 व्या वर्षी कायम राहणे, हे दुर्मीळ असते. ध्यासाचा हा वसा आमच्या नजरेसमोर आहे. आम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी हा आधारवड सतत सोबत आहेत. हे आमचे अहोभाग्य आहे,’ अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्नुषा डॉ. चित्रलेखा यांनी व्यक्त केली.

शिवशाहीर आज वयाच्या 99 व्या वर्षात पदार्पण करित आहेत. यानिमित्त डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी या शिवयोगी इतिहासाचार्याच्या आठवणींना “प्रभात’कडे उजाळा दिला.

डॉ. पुरंदरे म्हणाल्या, “लहानपणी बाबासाहेब पुरंदरे शुक्रवार पेठेत राहत होते. त्यांच्या आईने पिशवी घेऊन पूजेचे साहित्य आणण्यासाठी पाठवले. सकाळी गेलेले बाबा दुपारपर्यंत घरी न आल्याने, शोधाशोध केली. त्यावेळी 8 वर्षांचे बाबा भारत इतिहास संशोधन मंडळात पुस्तक वाचण्यात गुंतले होते. त्यांची इतिहासाची आवड लक्षात आल्यानंतर, त्यांचे वडील त्यांना किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले. पुण्यात प्लेगची साथ आल्याने नागरिक सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी डोणजे गावात राहायला गेले. दरम्यान, मागे किल्ला दिसत असल्याचे बाबांना लक्षात आले. त्यावेळी त्यांनी “सिंहगड’ पाहण्याचा हट्ट धरला. त्यांची ही आवड आजही कायम आहे.

बाबांचा वाढदिवस हा आमच्यासाठी एक मोठा समारंभ असतो. मात्र, यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे बाबांनी सांगितले आहे. ते नेहमी म्हणतात, “मी कधी निराश, हताश होत नाही. कारण, माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. आपण प्रत्येक गोष्टीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’ बाबांच्या “राजा शिवछत्रपती’ पुस्तकाने अनेक विक्रम केले. एकाच विषयावर त्यांनी 12 हजारांवर व्याख्याने दिली. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही आशीर्वाद आहे.

एकदा सावरकर केसरी वाड्यामध्ये आले होते. साधारण 12-13 वर्षांचे असताना, बाबांनी सावरकर भाषण कसे करतात, याची नक्कल सावरकरांसमोर करून दाखवली. त्यावेळी सावरकरांनी शाबासकी दिली आणि म्हणाले, “इकडे ये, तू छान नक्कल केलीस. पण, आयुष्यभर अशाच नकला करणार आहेस का? स्वत:चे असे काहीतरी कर.’ ते शब्द बाबांच्या मनात रुजले आणि तेव्हापासून त्यांनी नक्कल करणे सोडून दिली. आपल्याकडे कथनशैली असल्याचे बाबांना वाटले आणि पुढे शिवचरित्र कथनाचा जन्म झाला,’ असे डॉ. पुरंदरे यांनी सांगितले.

“वयाच्या 18-19 वर्षांचे बाबांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ते येरवड्याच्या तुरुंगात असताना शिवचरित्र सांगायला सुरूवात केली. त्यांच्याहून वयाने मोठी असणारी मंडळी देखील वक्तृत्वाने भारावली, त्यांनी शाबासकी दिली आणि तेव्हापासून त्यांच्या मनात काहीतरी लिहावे, बोलावे असे मनावर घेतले. त्यांच्या हातून लिखाण आणि व्याख्यान घडले. शिवसृष्टी निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी त्यांना केवळ 125 वर्षांचे आयुष्य मिळावे, असे ते नेहमी म्हणतात. त्यांना परमेश्‍वराने 125 वर्षांचे निरोगी आयुष्य द्यावे, असे मागणे आहे आणि त्यांच्या मनातील सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत,’ असे पुरंदरे नमूद केले.

खचून जायचे नाही
“आपण खचून जायचे नाही. आपण काळजी करायची नाही. आम्हांला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते, तर स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात होते. आपण आपले धैर्य खचू द्यायचे नाही, धीर सोडायचा नाही. ही वेळदेखील निघून जाणार आहे. या वीरांचे आदर्श आपण ठेवले पाहिजे’, असे बाबा आम्हांला लॉकडाऊनमध्ये नेहमी सांगतात,’ असे डॉ. पुरंदरे यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.