पुणे – बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी पाळलेला बकरा चोरून नेताना समर्थ पोलिसांच्या गस्ती पथकाने एकाला पकडले आहे. या चोरलेल्या बकऱ्याची बाजारात विक्री करण्यात येणार होती. हा बकरा सानियन जातीचा असून त्याची किंमत 25 हजार इतकी होती. तफिम बेग (रा. मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे.
समर्थ पोलीस स्टेशनकडील पोलीस कर्मचारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शेट्टीबा शिंदे, पोलीस शिपाई पेरणे व मोरे हे बकरी ईदच्या अनुषंगाने हद्दीत पायी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना एक इसम घाईगडबडीत उच्च प्रजातीचा बकरा घेऊन नरपतगिरी चौकातून जाताना दिसला. त्यांना इसमाचा संशय आल्याने त्यास थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने बकऱ्याबाबत असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली असता हा बकरा त्याने नाना पेठ येथून चोरल्याचे सांगितले.
त्या बकरा मालकाचा शोध घेण्यात आला असता यासर काझी (रा. नाना पेठ) यांनी बकरा चोरीस गेल्याचे सांगितले. त्यांची फिर्याद घेऊन आरोपी विरोधात भा.दं.वि. कलम 379 गु. र. नं. 243/19 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, सहायक उपनिरीक्षक शेट्टीबा शिंदे, पोलीस शिपाई हेमंत पेरणे, सुभाष मोरे, नीलेश साबळे, घनवट, साहिल शेख, सचिन पवार, कोळी, अनिल शिंदे आणि पोलीस हवालदार राजस शेख, सुशिल लोणकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक प्रमोद टिळेकर करत आहेत.