पुणे – करोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या मोफत शिवभोजन थाळीचा मंगळवारी (दि.14) शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या थाळीसाठी संबंधित नागरिकांना दहा रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
याबाबत शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने माहिती दिली आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत 37 केंद्रांद्वारे दररोज 6 हजार थाळ्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुण्यात शिवभोजन थाळी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने वाढीव थाळ्यांचा प्रस्ताव आहे.
याबाबत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले म्हणाले, “शिवभोजन थाळी योजना सुरू झाल्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. करोनामुळे राज्य शासनाच्या निर्णयानुसार मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. मात्र, त्याची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यानंतर संबंधितांना प्रतिथाळी दहा रुपये शुल्क केंद्रचालकाला द्यावे लागणार आहे. केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे 40 रुपये अनुदान मिळते. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बॅंक खात्यात दर 15 दिवसांनी जमा करण्यात येते.’