आरटीई प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

मुदतवाढीची तारीख संपणार ः संध्याकाळपर्यंत स्वीकारणार ऑनलाईन अर्ज

पिंपरी –
राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी शनिवार, दि. 30 मार्च हा शेवटचा दिवस असून शनिवारी संध्याकाळपर्यंतच आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच खूपच गोंधळ झाला होता. ऑनलाईन अर्जात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने कित्येक पालकांना अर्जच करता आले नव्हते, यामुळे मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ देखील शनिवारी संपत आहे.

गरीब विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी 25 टक्‍के जागा राखीव ठेऊन त्यावर आरटीईमार्फत प्रवेश देण्यात येतो. यावर्षी शहरातील शाळांमध्ये आणि आरटीई जागांमध्ये देखील वाढ झाली आहे. परंतु प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून सावळा गोंधळ सुरू होता. सुरुवातीचे काही दिवस आरटीईचे संकेतस्थळच हॅंग होत असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचण येत होती.

त्यानंतर गरीब पालकांना रहिवाशी पुरावा म्हणून आवश्‍यक असणारे घरमालकाचे पत्र मिळवण्यासाठी देखील खूप प्रयत्न करावे लागले होते. तसेच आपल्या घराचे लोकेशन गुगल मॅपशी जुळवून अपलोड करण्याच्या नियमाने पालकांचा घाम काढला होता. अशा कित्येक अडचणी पाहता 22 मार्चपर्यंत असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून 30 मार्च करण्यात आली. मुदतवाढ दिलेली तारीख देखील आजच संपणार आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेस विलंब झाल्याने पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. अजूनही अनेक पालक अर्ज करुन शकलेले नाहीत, त्यांच्यासमोर कागदपत्रांसह कित्येक अडचणी आहेत. त्यामुळे अजून मुदतवाढ देण्यात यावी, अशीही मागणी काही पालकांनी केली आहे.

प्रवेश प्रक्रियेमध्ये कमाल वयोमर्यादेत वाढ

आत्तापर्यंत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी बालकाची वयोमर्यादा किमान 6 वर्ष व कमाल 6 वर्ष 11 महिने होती. मात्र, आता यामध्ये वाढ करण्यात आली असून आता वयाची कमाल मर्यादा 7 वर्ष 2 महिने करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पालक आरटीई अंतर्गत अर्ज करु शकणार आहेत. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी किती अर्ज आले आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार हे चित्र येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)