पुणे – ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती, पत्नी और वो’, ‘तुम्हारे लिए’, ‘सफेद झूठ’, ‘मुक्ती’ ‘सबूत’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली दिवंगत अभिनेत्री “विद्या सिन्हा” यांचा आज जन्मदिन आहे. 15 नोव्हेंबर 1947 रोजी मुंबई येथे विद्या यांचा जन्म झाला.
विद्या सिन्हा यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच, त्यांनी सिनेमांव्यतिरिक्त ‘काव्यांजली’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.
विद्या सिन्हा 2011 मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात झळकल्या होत्या. तसेच, बिजली या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. विद्या सिन्हा यांनी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला होता. मात्र, काहीच महिन्यांत त्यांनी घटस्फोट घेतला.
दरम्यान, बॉलिवूडला 80 च्या दशकात उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या ‘विद्या सिन्हा’ हृदय व फुफ्फुसाच्या विकारानं त्रस्त असल्याने 15 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईत त्यांचा निधन झाले.