मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या विरोधात विधानसभेत फ्लोर टेस्टसाठी मी गुरुवारी मुंबईला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे. शिंदे यांनी गुवाहाटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ते त्यांच्या गटातील सर्व आमदारांसह मुंबईला पोहोचणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बंडखोर आमदार आज गोव्याला रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बंडखोर आमदारांसाठी 70 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यानंतर सर्व आमदार गुरुवारी मुंबईला रवाना होतील. महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर ते थेट विधानसभेत जाणार आहेत.
गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडलेल्या शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात महाराष्ट्रातील लोकांच्या शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केले. शिंदे यांनी मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम्ही नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहोत.’असही ते यावेळी म्हणाले आहे.
दरम्यान,सेनेच्या 39 आमदारांसह अन्य छोट्या पक्षाचे व अपक्ष असे जवळपास 50 आमदार आघाडीतून फुटले आहेत. अशातच राज्यात सरकार चालवण्यासाठी ठाकरे यांच्या सरकारकडे बहुमत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा राज्यपालांची भेट घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी केली होती. विरोधीपक्ष भाजपची ही मागणी मान्य करत राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला आहे. राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार आता ठाकरे सरकारला उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावेळी ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार का हे पाहावे लागणार आहे.