लसीकरण मोहिमेला वेग ; आज देशातील 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये ‘कोविशील्ड’ लस पोहचणार

नवी दिल्ली : 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देश एकजूट होऊन काम करत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून रात्री उशिरा एकूण सहा कंटेनर लस घेऊन रवाना झाले. तीन ट्रक मुंबई विमानतळाच्या दिशेने पाठवण्यात आले. तर पुणे विमानतळ आणि बेळगावसाठी उर्वरित ट्रक रवाना करण्यात आले.

मुंबई विमानतळावरुन 22 ठिकाणी कोरोनाची लस पाठवण्यात येणार आहे. याशिवाय आज देशातील 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस पोहोचण्याची अपेक्षा आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होण्याच्या चार दिवस आधी ‘कोविशील्ड’ लसीची पहिली बॅच मंगळवारी 13 शहरांमध्ये पाठवण्यात आली. कोविशील्ड लसीचे 54.72 लाख डोस काल दुपारी चार वाजेपर्यंत पोहोचवण्यात आले. 14 जानेवारीपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1.1 कोटी आणि भारत बायोटेककडून 55 लाख डोस मिळतील.

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण अभियान सुरु होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात भारतातील तीन कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाल्यानंतर आता भारतात लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे.

लसीच्या डिलिव्हरीच्या वेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला म्हणाले की,”हा ऐतिहासिक क्षण आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे मोठं आव्हान आहे आणि ते पूर्ण करण्याच्या कामात आम्ही गुंतलो आहोत. खरं आव्हान लस सामन्य जनता, संवेदनशील समूह आणि आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आहे.”

“आमचे ट्रक पहाटेच इन्स्टिट्यूटमधून रवाना झाले आणि आता ही लस देशभरात वितरित केली जात आहे. हा अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आहे. कारण वैज्ञानिक, तज्ज्ञ आणि याच्याशी संबंधित सगळ्यांनी एक वर्षापेक्षा कमी काळात लस विकसित करण्यात अतिशय परिश्रम घेतले. सीरम इन्स्टिट्यूटने भारत सरकारला 200 रुपयांच्या विशेष किंमतीत लस दिली आहे,” असे अदर पुनावाला यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.