आज मतमोजणी; मात्र नवीन कार्यपद्धतीमुळे निकालाला होणार विलंब

नवी दिल्ली – साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारतीय संसदेच्या 542 जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता विविध ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर सुरू होत आहे. तथापी प्रत्येक लोकसभा मतदार संघांतील प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान पाच मतदान केंद्रांच्या मतदान यंत्रावरील मतदानाच्या नोंदीची पडताळणी व्हीव्हीपॅट मशिनवर नोंदवण्यात आलेल्या मतदानाशी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा विलंब होण्याची शक्‍यता आहे. सायंकाळी उशिरापर्यंत बहुतांशी निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे.

देशात या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 90 कोटी 99 लाख इतकी होती. त्यापैकी 67.11 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला आहे. मतदान यंत्रावर झालेल्या मतदानाची पडताळणी व्हीव्हीपॅट मशिनवरील स्लीपांशी केली जाण्याचा यंदाच्या वर्षातला हा पहिलाच प्रकार आहे. एकूण 10.3 लाख मतदान केंद्रांपैकी 20 हजार 600 केंद्रांवर अशी पडताळणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पोस्टाने आलेली मते मोजली जाणार आहेत. देशातील एकूण 16 लाख 49 हजार मतदारांनी पोस्टाने मतदान केले आहे. ती मते आधी मोजली जाणार आहेत.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीच्या प्रक्रियेसंबंधात माहिती देताना आयोगाने सांगितले की, प्रथम व्हीव्हीपॅट मशिनवर नोंदवल्या गेलेल्या मतदानाच्या चिठ्यांचे मतदान मोजले जाईल आणि त्यानंतर त्याला जोडलेल्या मतदान यंत्रांवरील मतदान मोजून ते जुळते की नाही याची पडताळणी केली जाणार आहे. जर ही मते जुळली नाहीत तर व्हीव्हीपॅटवरील मतदान अंतिम समजले जाणार आहे. देशात एकूण 543 लोकसभा मतदार संघ आहेत त्यापैकी वेल्लोरची निवडणूक मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखवल्याच्या प्रकरणांमुळे रद्द बातल ठरवण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×