आज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

बॅंकांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली :  बॅंकांच्या विलीनीकरणाच्या निषेध आणि ठेवींच्या दरात कपातीचा निषेध नोंदविण्यासाठी काही बॅंक कर्मचारी संघटनांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे सरकारी बॅंकांच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. तथापि “ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन’ (एआयबीईए) आणि “बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ने (बीईएफआय) दिलेल्या संपात अधिकारी आणि खाजगी क्षेत्रातील बॅंका सहभागी होणार नाहीत.

देशातील सर्वात मोठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) सह बहुतांश बॅंकांनी हा संप आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी ग्राहकांना आधीच पूर्वकल्पना दिली आहे. या संपामध्ये “एसबीआय’चे फारच थोडे कर्मचारी सहभागी होणार असल्याने संपाचा परिणाम फारच थोडा असेल, असे “एसबीआय’ने म्हटले आहे.

प्रस्तावित संपाच्या दिवशी बॅंक शाखांच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्‍यक ती पावले उचलली आहेत. मात्र तरिही बॅंकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे सिंडिकेट बॅंकेने म्हटले आहे. मुख्य कामगार आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती “एआयबीईए’चे सरचिटणीस सी एच. वेकाटाचलम यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांच्या संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी देशपातळीवरील बॅंकांचा संप पुकारला होता. नंतर सरकारच्या हस्तक्षेपानंतर हा संप मागे घेण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.