ग्रामीण भागातील दर तीन पैकी एका व्यक्तीला तंबाखूचे व्यसन

तंबाखू सेवनाने होणारे नुकसान
-धुम्रपानामुळे 7000 विषारी रसायनांशी संपर्क येतो ज्यात 70 घटक कार्सिनोजेनिक असून ते शरीरातील बहुतेक सर्व अवयवांचे नुकसान करतात.
-तंबाखूमुळे होणारे नुकसान जन्माआधीपासूनच सुरू होते. ज्या महिला गरोदरपणात धुम्रपान करतात, त्यांच्या नवजात बालकांना जन्मजात आजार, कर्करोग, फुफ्फुसाचे विकार आणि अचानक होणारा मृत्यू असे धोके असतात.
-मूत्रपिंडे निकामी होणे, आतड्यांमधील रक्त कमी होणे आणि हायपरटेन्सिव्ह हृदयविकार हे तंबाखूचे धोके नव्याने आढळून आले आहेत.
-धुम्रपानामुळे त्वचा कोरडी आणि पिवळी पडते व सुरकुत्या पडतात.
-फुफ्फुसांचा कर्करोग हा पुरुषांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणारा मोठ्या प्रमाणावर आढळणारा घटक आहे आणि अनेक देशांमध्ये महिलांच्या मृत्यूसाठीही तो सर्वाधिक प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. या रोगाने स्तनांच्या कर्करोगालाही मागे टाकले आहे.
-जगभरातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारे हृदयविकार आणि स्ट्रोक हे आजारही तंबाखू सेवनाशी संबंधित आहेत.
-तुमच्या स्नायूंमध्ये रक्त आणि ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खेळताना किंवा व्यायाम करताना तेव्हा दुखापत होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे तंबाखूसेवन कमी करा आणि निरोगी व सुदृढ राहा.

भारतात तंबाखू अनेक प्रकारच्या धुम्ररहित प्रकारांमध्ये वापरला जातो. यात तंबाखू पान, मशेरी, खैनी, गुटखा, भुकटी आणि पान मसाल्यामधील एक घटक म्हणून तंबाखूसेवन केले जाते. तंबाखू पानामध्ये नागवेलीचे पान, सुपारी, चुना, तंबाखू, कात आणि बडीशेप घालतात. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागांमध्ये तंबाखूबद्दल कमी जागरूकता आहे. त्यामुळे ज्यांना तंबाखू सोडायचा नाही आणि तंबाखूच्या अतिसेवनामुळे जे आपले जीव गमावतात त्या ग्रामीण भागांतील लोकांचे डोळे उघडण्यासाठी हा लेख माहितीपूर्ण ठरेल. साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्यावतीने वेळोवेळी यासंदर्भात जनजागृती केली जात असून त्यानुषंगाने विविध उपक्रमही राबविले जातात.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे 2018 साली प्रकाशित केलेल्या “ग्लोबल ऍडल्ट टोबॅके सर्व्हे 2′ (जीएटीएस 2) नुसार ग्रामीण भागातील दर तीनपैकी 1 व्यक्ती आणि शहरी भागातील दर पाचपैकी 1 व्यक्ती तंबाखूचे या ना त्या प्रकारे सेवन करते. भारतात खैनीचे सेवन सर्वाधिक प्रमाणात होते. खैनी म्हणजेच तंबाखू चुन्याच्या मिश्रणाचे दर नऊ प्रौढांपैकी एकाकडून (11.2%) सेवन केले जाते. दुसऱ्या क्रमांकावरचे सर्वाधिक सेवन केले जाणारे उत्पादन म्हणजे विडी. 7.7% प्रौढ भारतीय विडी ओढतात.

गुटखा हे तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण असलेले उत्पादन तिसऱ्या क्रमांकावर (6.8%) आहे तर तंबाखू पान चौथ्या क्रमांकावर (5.8%) आहे. तंबाखूसेवनाचे पुरुषांमधील प्रमाण 42% आहे तर महिलांमध्ये 14.2% आहे, असे या अहवालातून दिसून आले आहे. त्याचप्रमाणे या अहवालात म्हटले आहे की, दर 10 भारतीयांपैकी 1 जण तंबाखूचे धुम्रपान करत असून ग्रामीण भागात हे प्रमाण 11.9% आहे तर शहरी भागांमध्ये 8.3% आहे. त्यामुळे आता तंबाखूला कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे. तर दिवसेंदिवस तोंडाच्या कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून दरवर्षी 3 लाखाहून अधिक रुग्ण आढळून आल्याचे सर्वेक्षणातंर्गत निष्पन्न झाले आहे. साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे हेड ऑन्कोसर्जन डॉ. मनोज लोखंडे यांनी देखील या सर्वेक्षणावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करत तंबाखू सेवनामुळे होणारे नुकसान तसेच विविध आजारांची माहिती दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)