मार्केट यार्डात पुणेकरांची तोबा गर्दी

करोना संसर्ग असतानाही प्रशासन सुस्त : आता काळजी घेण्याचे आश्‍वासन


एस-एस-एस या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणार


पोलीस बंदोबस्त, रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी

पुणे – शहरावर करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना मार्केट यार्ड मात्र रविवारी ओसंडून वाहत होते. पुणेकरांनी या परिसरात तोबा गर्दी केली होती. त्यामुळे येथील पार्किंगही फुल झाले होते. येथे ना सुरक्षित अंतर ना सॅनिटायझर, अशी परिस्थिती होती. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी पाहणी करत परिसरात करोना प्रतिबंधक नियम कठोरपणे राबवणार असल्याचा दावा केला आहे. पण, त्याला पुणेकर आणि पालिका-पोलीस प्रशासनाने पाठिंबा देणे आवश्‍यक आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनानेही आता पुढाकार घेतला आहे. मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात होणाजया गर्दीवर नियंत्रण मिळविण्याबरोबर मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर यासारख्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.

रविवारी सकाळीच बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी मार्केट यार्ड आवाराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी करोना प्रतिबंधाबाबत काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती दिली. यावेळी सहायक सचिव बाळासाहेब गायकवाड, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, फळबाजार विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे आदी उपस्थित होते.

बाजार बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. कडक निर्बंध लावा, पण बाजार बंद करू नका अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच पुणेकरांना भाजीपाला वेळेवर मिळावा, यासाठी भाजीपाला तसेच फळविभाग सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्केटयार्डात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही पोलिसांची मदत मागितली आहे. चार ते पाच पोलीस कर्मचारी बाजार आवारात पहाटेपासून उपस्थित राहिल्यास खरेदीदार ते नियमांचे पालन करतील. ऍन्टिजेन चाचणीसाठी केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. फळ, भाजीपाला, तसेच फूल, भुसार आवारात सुमारे एक हजाराहून अधिक व्यापारी तसेच त्यांचे कामगार येथे दररोज येतात. शिवाय व्यापारी, कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी बाजार समितीने केली आहे, असेही गरड म्हणाले.

सद्यःस्थितीत आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी तसेच बाजार आवारात गर्दी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गेट क्रमांक चारजवळ आंबा व्यापारासाठी शेड उभारले आहे. त्यामुळे विक्रेत्यांची तेथे सोय करण्यात आली आहे. परिणामी, वाहतूक कोंडी व गर्दीही टाळण्यास मदत होणार आहे.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.