नगर – जिल्हा परिषदेत ज्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद मिळविण्यावरून महाविकास आघाडीतील चारही पक्षात तिढा निर्माण झाला होता तो पेच आता सोमवारी,दि.27 सुटणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होऊन ते अर्थ-बांधकाम व कृषी-पशुसंवर्धन समिती सभापती पदांचे वाटप करतील.यातील क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख व शिवसेनेचे काशिनाथ दाते यांना कोणती समिती मिळणार हे स्पष्ट होईल.
जिल्हा परिषदेत सत्ताधारी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना व क्रांतीकारी शेतकरी पक्ष या चारही पक्षांना महत्वाची मानली जाणारी अर्थ-बांधकाम समिती हवी होती. मात्र चार पक्षांना चार समित्या देताना राष्ट्रवादीला समाजकल्याण,कॉंग्रेसला महिला बालकल्याण,शिवसेनेला अर्थ व बांधकाम तर क्रांतीकारी पक्षाला कृषी व पशुसंवर्धन समिती देण्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निवडीच्या वेळी यावरून चांगलेच रणकंदन झाले.
चारही पक्ष या समितीसाठी हटून बसले होते. त्यात तडजोड होऊन पूर्वी चर्चा झाल्याप्रमाणे समाजकल्याण राष्ट्रवादीचे उमेश परहर यांना,तर महिला बालकल्याण समिती कॉंग्रेसच्या मीराताई शेटे यांना देण्यात आली. उर्वरीत दोन विषय समित्यांपैकी एकावर शिवसेनेचे काशिनाथ दाते यांची,तर एकावर क्रांतीकारी पक्षाचे सुनील गडाख यांची वर्णी लागली आहे. अजूनही यातील अर्थ-बांधकाम कुणाला व कृषी-पशुसंवर्धन कुणाला हे नक्की नाही.
अध्यक्षांनी बोलविलेल्या विशेष सभेत हा निर्णय अध्यक्षांचा असेल.अध्यक्ष घुले ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या असून राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष अर्थ-बांधकाम समिती शिवसेनेला देण्याच्या मनस्थितीत नाही. तसेच शिवसेनेच्या बहुतेक सदस्यांचा दाते यांना विरोध आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांचाही दाते यांना स्थानिक राजकारणातून विरोध आहे. त्यामुळे अर्थ व बांधकाम समिती त्यांच्याऐवजी े सुनील गडाख यांना जाण्याची शक्यता आहे.
दाते व गडाख या दोघांच्याही समर्थकांनी अर्थ-बांधकाम समितीचे सभापती आपल्यालाच मिळाली असल्याच्या पोस्ट सत्कार करताना सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. तसेच दाते व गडाख या दोघांचे समर्थक आमच्याकडेच अर्थ व बांधकाम समिती येणार असल्याचा दावा करत असल्याने हा पेच आता सोमवारी दि.27 प्रत्यक्ष घोषणनेनंतरच सुटेल असे चित्र दिसत आहे. एकदंरीत राजकीय समीकरणे बघता सुनील गडाख यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती जाईल असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे. तसे झाल्यास कृषी व पशुसंवर्धन समिती काशिनाथ दाते यांच्या रूपाने तिसऱ्यांदा पारनेर तालुक्याला ही समिती मिळेल.