नीना गुप्ताच्या सच कहूँ तो या आत्मचरित्राची सध्या खूप चर्चा आहे. यात तिने बॉलीवूडमधल्या तिच्या परिचयाच्या नामांकित व्यक्तींबाबत काही खुलासे केले आहेत. असाच एक खुलासा तिने निर्माता- दिग्दर्शक- अभिनेता सतीश कौशिकबद्दल केला आहे व त्याला आता सतीशनेही उत्तर दिले आहे.
आपण जेव्हा गरोदर होतो तेव्हा सतीशने आपल्याला लग्नासाठी मागणी घातली होती, असे नीनाने पुस्तकात म्हटले असल्याने चर्चा सुरू झाली आहे. त्याला सतीशने होकार दिला आहे. तो म्हणतो की नीना माझी मैत्रिण होती आणि आहे. 1975 पासून आमची मैत्री आहे. आम्ही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दिल्लीत करोल बाग येथे आमची घरेही जवळजवळच होती व आमचे कुटुंबीय आम्हाला ओळखायचे. एकाच दिल्ली युनिव्हर्सिटीत आम्ही शिकलो.
नीनाचे विचार आणि दिसणे यामुळे ती जेव्हा यायची तेव्हा कॉलेजमध्ये हंगामा व्हायचा. ती जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा आपल्याला त्याची माहिती होती. त्यामुळे एक सच्चा मित्र म्हणून तू एकटी नाही अशा माझ्या भावना त्या प्रपोज करण्यात मी व्यक्त केल्या होत्या. मी आहे ना, तू कशाला काळजी करते, असे मी तिला म्हणालो होतो. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू होते, असेही सतीशने एका मुलाखतीत म्हटले आहे.
सतीश म्हणतो, “सच कहूँ’ तो लिहिण्याच्या अगोदर नीनाने त्याला याची कल्पना दिली होती. मीच तिला बिनधास्त लिहिण्यास सांगितले होते. इतकी आमची मैत्री घट्ट आहे. माझ्या पत्नीलाही याची कल्पना आहे व ती आमच्या या मैत्रीचा सन्मान करते.