कचरा डेपो हलविणाऱ्या उमेदवारास पाठिंबा देणार

संगमनेर खुर्द परिसरातील ग्रामस्थांचा निर्धार

संगमनेर – संगमनेर पालिकेच्या संगमनेर खुर्द येथे असलेल्या कचरा डेपोमुळे या परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे हा कचरा डेपो हलवावा, यासाठी परिसरातील गावांनी आंदोलने केली. मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे हा डेपो हटविण्यास शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जो उमेदवार मदत करेल, त्यास जाहीर पाठिंबा देणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असून, तसे प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, संगमनेर खुर्द येथे पालिकेचा कचरा डेपो आहे. सदर डेपोचा या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे. याबाबत अनेकवेळा येथून कचरा डेपो हटविण्यासाठी आंदोलने केली. तसेच प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा केला. परंतु केवळा आश्‍वासनेच देण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत.

तसेच नगर व नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रारी दाखल केलेल्या आहेत. पुणे येथील हरित लवादाकडेही कृती समितीने याचिका दाखल केली आहे. तरीही अद्यापपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जो उमेदवार कचरा डेपो हटविण्यास मदत करेल, त्यास पाठिंबा देणार असल्याचे कचरा डेपो हटाव कृती समिती संगमनेर खुर्द, चक्रधर स्वामी तरुण मित्रमंडळ, शिवशक्ती तरुण मित्रमंडळ, एकता तरुण मित्रमंडळ, छत्रपती ग्रुप आणि परिसरातील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. सदर निवेदनावर कचरा डेपो हटाव कृती समितीचे अध्यक्ष रामराव गुंजाळ, चक्रधर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष शिंदे, शिवशक्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल सुपेकर, एकता मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय गुंजाळ यांसह परिसरातील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.