ठेकेदारांची अनामत रक्‍कम जप्त करणार

बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

बारामती – नगरपरिषदेच्या विविध विकासकामांना मुदतवाढ देताना यापुढील काळात जे ठेकेदार मुदत देवूनही कामे पूर्ण करणार नाहीत, त्यांची अनामत रक्‍कम जप्त करीत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि. 8) झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, कार्यालय अधिक्षक शिवाजी शिंदे उपस्थित होते. बैठकीत विषयपत्रिकेवरीले 17 विषयांना मंजूरी देण्यात आली. नगरपरिषदेच्या विविध विकासकामांना मुदतवाढ देण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यासंबंधीची यादी नगरसेवकांना देण्यात आली होती. परंतु अनेक अपूर्ण कामांचा तपशील त्यात नसल्याची बाब नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली. तीन हत्ती चौक सुशोभीकरण करणे, भिगवण चौकातील अपूर्ण कामासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल असताना या विषयांना मुदतवाढ द्यायची कशी ? असा सवाल विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी केला. तीन हत्ती चौकातील कामाला जलसंपदा विभागाने ना हरकत पत्र दिले आहे का? अशी विचारणाही सस्ते यांनी केली. ठेकेदाराची ठेव कपात न करता त्याला बिल दिले असल्याचा मुद्दाही नगरसेवकांनी उपस्थित केला. शिवाय ही बाब बेकायदेशीर असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या विषयावर प्रशासन निरुत्तर झाले.

तांदुळवाडीच्या हद्दीत भुयारी रेल्वे पुल उभारण्याच्या कामासाठी पालिकेच्या खात्यातून रेल्वे खात्याला 2 कोटी 76 लाख रुपये देण्याच्या विषयालाही मंजूरी देण्यात आली. शहराच्या विविध भागात मुरुम टाकण्यासाठी 15 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. पालिकेतील सध्याची सीसीटीव्ही यंत्रणा हलक्‍या प्रतीची असून तेथे चांगल्या प्रतिचे कॅमेरे बसविण्यास मंजूरी देण्यात आली;परंतु हे करीत असताना मागील ठेकेदाराने हलक्‍या दर्जाचे कॅमेरे का वापरले? असा सवाल करत त्यांच्यावर कारवाईची मागणी सस्ते व विष्णूपंत चौधर यांनी केली. पालिकेत अद्ययावत सर्व्हर बसविला जाणार आहे. तो बसविल्यानंतर तरी दाखले व अन्य अनुषंगिक कामांमध्ये गती यावी अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्‍त केली. तसेच मंडई व पदपथावरील हातगाड्यांच्या फाडलेल्या पावत्यांची नोंद संगणकावर व्हावी, अशी मागणी सस्ते यांनी केली.

शहरानजीक ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या गट क्रमांक 97मध्ये भारत सरकारचा खेलो इंडिया हा प्रकल्प विकसित होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवून तो वाढीव हद्दीच्या विकास योजनेत समाविष्ट कऱण्याची प्रक्रिया सुरु करण्याला तसेच येथील पोहोच रस्ता रुंद करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातील बचतीच्या रकमेतून प्रभाग 11 मध्ये उर्वरित कामे करण्यासंबंधीचा तक्ता प्रशासनाने दिला होता. तो अपूर्ण असल्याची बाब राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव यांनी निदर्शनास आणून देत जी रक्कम शिल्लक असेल त्यातून या प्रभागातील रस्त्यांची कामे तात्काळ मार्गी लावा, असे मत व्यक्त केले. बहुप्रतिक्षित शेंडेवस्त्‌ीचया कामालाही सभेने मंजूरी दिली.

डाटा एन्ट्री ऑपरेटर वेतनापासून वंचित
पालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरविण्याचे काम पालिकेने इशान सिस्टिम कंपनीला दिले आहे. या कंपनीने गेली पाच महिने ऑपरेटरांना वेतनच दिलेले नाहीत. पालिकेने कंपनीशी करार करताना तांत्रिक कारणाने बिल देण्यास उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करावेत, असे नमूद केले आहे. तरीही ही कंपनी कर्मचाऱ्यांना वेतन करीत नसल्याचा मुद्दा नगरसेवकांनी सभेत मांडला. कंपनीशी बोलून त्यावर आवश्‍यक त्या कार्यवाहीचे आश्‍वासन नगराध्यक्षांनी दिले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अपूर्णच
शहरातील तीनपैकी दोन सांडपाणी प्रकल्पाचे कामच सुरू झालेले नाही. एका प्रकल्पाचे काम सुरु झालेले आहे. या प्रकल्पाची दोन वर्षे देखभाल संबंधित ठेकेदार कंपनीने करणे गरजेचे आहे; परंतु त्यांच्याकडून कोणीही व्यक्‍ती देखभालीसाठी ठेवण्यात आलेला नाही, असा मुद्दा सभेत सुनील सस्ते यांनी मांडला. या कंपनीला वारंवार मुदतवाढ देवू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.