बंगळुरू – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. या परिस्थितीत एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी तब्बल ३०० किमी अंतर पार केले. ४५ वर्षीय आनंद यांचा मुलगा न्यूरोलॉजिकल आजाराने पीडित असून तो म्हैसूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या टी नरसीपुरा तालुक्यातील गनिगन कोप्पलु गावात वास्तव्यास आहे.
एक इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार आनंद यांना आपल्या मुलाच्या उपचारासाठीची आवश्यक औषधी आणण्यासाठी बंगळुरूला जावं लागतं. येथे त्यांना मोफत औषधं मिळतात. त्यातच डॉक्टरांनी औषधांचा खंड पडू न देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. अन्यथा मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असंही सांगितलं आहे.
याच कारणामुळं आनंद यांनी कोणतही साधन न मिळाल्यामुळे सायकलवर प्रवास करण्याचा निर्णय़ घेतला. त्यानंतर त्यांनी चार दिवसांत आपल्या जुन्या सायकवर ३०० किमी अंतर पार करून औषध आणली. त्यांनी बंगळुरू ते म्हैसूर असं जाऊन-येऊन ३०० किमी अंतर पार केलं. निम्हंस येथे एका डॉक्टरने आनंद यांची तळमळ पाहून एक हजार रुपयांची मदत देखील केली होती.
आनंद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आनंदी यांनी सांगितलं की, सतत सायकल चालविल्यामुळे पाठदुखीचा त्रास झाला. त्यांनी डॉक्टरांकडून ट्रिटमेंट घेतली असून ते आता बरे आहेत.