बीएसएनएल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मोदींना साकडे

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. यासंबंधात आता तेथे काम करणारे अभियंते आणि अकाऊंट विभागातील कर्मचारी संघटनांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून बीएसएनएल साठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून सदर कंपनीला मदत करण्याचे साकडे घातले आहे. बीएसएनएल अलिकडच्या काळात अधिकाधिक गाळात जाताना दिसत आहे. यासाठी कंपनीचे अकार्यक्षम कर्मचारी जबाबदार असतील तर त्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी या संघटनांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. या कंपन्यांना 4 जी सेवा प्रदान करण्याची सुविधाही त्वरीत देण्यात यावी अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.

सरकारकडून किमान मुलभत आर्थिक आधार मिळाला तरी या कंपन्यांचे अर्थकारण सुधारू शकते असा विश्‍वासही या संघटनांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांसाठी परफॉर्मन्सवर आधारीत मॅकेनीझम तयार करण्याची शिफारसही या संघटनांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्या आधारे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिस मिळू शकेल आणि अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवता येईल. गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

यातील एमटीएनएल ही कंपनी मुंबई आणि दिल्ली शहरात दूरध्वनी सेवा देते तर बीएसएनएल ही कंपनी देशातील उर्वरीत 20 सर्कल मध्ये दूरसंचार सेवा देते. यातील एमटीएनएलही सातत्याने तोट्यात चालत आहे. तर बीएसएनएल ही अजूनही काही नफ्यात चालत असली तरी तिचा नफा दरवर्षी कमीकमी होताना दिसत आहे. मात्र ही कंपनी अजूनही स्वयंपुर्ण असून बाजारातील स्पर्धात्मक वातावरणातही ही कंपनी आपला नफा कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.