परिवर्तन मंडळाचे माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर धरणे

आर्थिक मलिदा लाटण्यासाठी नोकर भरती करत असल्याचा आरोप

नगर: माध्यमिक शिक्षक सोसायटीची नोकर भरती न्यायप्रविष्ट असताना सत्ताधारी संचालक मंडळाने आर्थिक मलिदा लाटण्यासाठी बेकायदेशीरपणे भरती प्रक्रिया सुरु ठेवल्याचा आरोप करीत परिवर्तन मंडळ व विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब राजळे, बाबासाहेब बोडखे आदिंसह सभासदांनी माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर धरणे आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करुन, आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.

संस्थेने लिपिक व संगणक ऑपरेटर पदाच्या भरती प्रक्रियेसाठी सोमवार दि.20 मे रोजी लेखी परीक्षा ठेवली होती. याच्या निषेधार्थ परिवर्तन मंडळ व विरोधी संचालकांसह सभासदांनी सोसायटीच्या कार्यालया समोर आंदोलन केले. संस्थेचे ऑनलाईनचे कामकाज सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण झालेले आहे. तसेच काही शाखांमध्ये सभासद संख्या दोनशे ते चारशे पर्यंन्त आहे. या अनेक बाबीचा विचार करता जास्त कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता नसतानाही सत्ताधारी संचालक मंडळाने संस्था व सभासद हित लक्षात न घेता तसेच नोकर भरती प्रक्रिया उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ व सहकार न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाही ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सत्ताधारी संचालक मंडळ केवळ नातेवाईकांची वर्णी लावण्यासाठी व आर्थिक मलिदा लाटण्यासाठी केवळ बहुमताच्या जोरावर ही बेकायदेशीर भरती करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा मान्यताप्राप्त संस्थेच्या स्वतंत्र यंत्रणेकडून राबविणे आवश्‍यक असताना सत्ताधारी मंडळाने केवळ दिखाऊपणा करण्यासाठी सभासदांनी नाकारलेल्या एका तज्ञ संचालकाच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणुक करुन 40 गुणांची लेखी प्रश्‍नपत्रिका काढण्याचा ठराव झाला असतानाही प्रत्यक्षात 80 गुणांची प्रश्‍नपत्रिका काढण्यात आली. उमेदवाराच्या मुलाखत पत्रात संदिग्धता असताना सर्व सदोष कार्यपद्धतीतून सत्ताधारी संचालक मंडळाचा नोकरभरतीचा हा केवळ फार्सच असून अनेक उमेदवारांची ही फसवणूक असल्याचे परिवर्तन मंडळाने स्पष्ट केले आहे. या धरणे आंदोलनात आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब राजळे, बाबासाहेब बोडखे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, छबुराव फुंदे, वसंतराव खेडकर, बद्रीनाथ शिंदे, अर्जुन भुजबळ, आदिनाथ नेटके, दिलीप मगर, रामेश्‍वर दुसुंगे, बाळासाहेब बोडखे, अंकुश बर्डे, राहुल जाधव, महेश दरेकर, भारत पाटील दळवी, बाळासाहेब जाधव, प्रशांत होन, संभाजी गाडे, सतीश सातपुते, प्रकाश बोंबले, प्रकाश धनवटे आदि सभासद सहभागी झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×